छत्र्या उगवाव्यात तसे विविध औद्योगिक वसाहतींत (इंडस्ट्रिअल इस्टेट) विजेवर चालणारे माग असलेले अनेक कारखाने निर्माण झाले. बॅंकांनीं त्यांना भरपूर पतपुरवठा केला. भरीला स्वस्त मजुरीत बारा बारा तास काम करणारे उत्तर प्रदेशी कामगार मिळाले. अशा छोट्या कारखान्यांत मफतलाल, सियाराम इ. ब्रँडच्या कापडाचें उत्पादन होऊं लागलें, अजूनही होतें. हे कापडाचे तागे नंतर विशिष्ट प्रक्रियेसाठीं मुख्य मिलमध्यें जातात व तेथून बाजारांत जातात. हें अजूनही चालू आहे. म्हणजे मिल बंद असूनही बाजारांत माल जातो आहे. मग मालक लोकांनीं कामगारांशीं (दत्ता सामंत यांची संघटना) . वाटाघाटी केल्याच नाहींत. सेंच्युरीसारखा एखादा सन्माननीय अपवाद वगळतां कित्येक मिल्सनीं  कामगारांची देणीं तर सोडाच त्यांचे पगारांतून कापून घेतलेले भविष्य निधी आणि कामगार विमा योजनेचे पैसेही भरलेले नाहींत. या दोन्हीं कायद्याअंतर्गत असें केल्यास गुन्हा नोंदवला जाऊं शकतो. भ्रष्टाचार आणि राजकीय वरदहस्त याच्या जोरावर सर्व धनदांडगे अशा कारवाईतून सुटले. 

संप अशस्वी होण्याचें श्रेय(?) दत्ता सामंत यांना दिलें जातें. कारण त्यांना संप मागें घेतां आला नाहीं. चूक नक्कीच दोन्हीं बाजूंची होती. सामंतांनीं नंतर अन्य क्षेत्रांतील कारखान्यांत हातपाय पसरले. मग सरकार, भांडवलदार, सगळ्यांनाच ते नकोसे झाले. 'मॅनेज' करतां न येणारा माणूस नकोच असतो. संपातील पुढील खेळी करण्यांत त्यांच्या चुकाही झाल्या असाव्यात. नंतर तर त्यांचा खूनच झाला. माझ्या घरांतील कोणीही वा कोणी नातेवाईकही कधीं  मिलमध्यें नव्हतें. मिल हा मुंबईतील संस्कृतीचा एक मोठा भाग होत्या. रोज सकाळीं ११, दुपारीं ३ आणि रात्रीं ११ असे मिलचे भोंगे होत असत. रात्रीं उशिरां कामावरून परत येणाऱ्या सभ्य कामगार बंधूंमुळें मध्यमवर्गीय स्त्रीवर्गाला देखील सुरक्षितता वाटत असे. मीं राहात असलेल्या दादर पश्चिम, शिवाजी पार्क विभागांत, कोहिनूर, इंदू, इ. मिल्स होत्या त्यांचे भोंगे ऐकूं येत असत. पण हा सर्व इतिहास माझ्या हयातीत घडला असल्यानें म. टा., लोकसत्ता, नवाकाळ इ. आघाडीच्या वृत्तपत्रांतील रोजच्या, मालक आणि मजूर अशा दोन्हीं बाजूंच्या बातम्या वाचून माझें तसें मत झालें आहे.  अजूनही बहुतेक औद्योगिक वसाहतींत  प्रसिद्ध मिलचें कापड बनवणारा किमान एकतरी कारखाना आढळतो. मी असे किमान दहा तरी कारखाने पाहिलेले आहेत.

सलग छापील संदर्भ वगैरे मात्र मीं देऊं शकणार नाहीं.

सुधीर कांदळकर