पुनर्जन्म या मूळ सिद्धांतावर कर्मसिद्धांत आधारलेला आहे. कर्माचे फळ कर्मातच असते हा त्यातूनच निर्माण झालेला उपसिद्धांत आहे. ज्यांना संस्कृत येत असेल त्यांना छांदोग्य उपनिषद वाचता येऊ शकेल. डिव्हाईन लाईफ सोसायटी तर्फे स्वामी शिवानंद "व्हॉट बिकम्स ऑफ द सोल आफ्टर डेथ" हे पुस्तक इंग्रजीतून प्रसिद्ध झाले आहे. इ-आवृत्ती दुवा क्र. १ येथे उपलब्ध आहे.

एखादा (सकारात्मक अथवा विधायक) हेतू ठेवून कर्म करणे हे गैर नव्हे. पण आपल्या नकळत त्या हेतूचे रुपांतर अपेक्षेत होते. अपेक्षेत रुपांतर झाल्यावर अपेक्षापूर्तीची मनोराज्ये करणे, अपेक्षाभंगाची भीती, या भीतीतून निर्माण होणारी काळजी, चिंता तर अपेक्षापूर्तीच्या आड येणाऱ्या सर्व गोष्टींचा राग, द्वेष आणि प्रत्यक्ष अपेक्षाभंगातून निराशा वगैरेची निर्मिती होत असते. अपेक्षापूर्तीतून आनंदाबरोबरच "मी कोणीतरी विशेष आहे", "मी केले", "माझ्यामुळे झाले", "मी नसतो तर कोणालाच जमले नसते" किंवा असाच कोणतातरी सूक्ष्म अहं जोपासला जाण्याची (व उत्तरोत्तर वाढण्याची) शक्यता असते. जर या अपेक्षेत आपण आपला आग्रह मिसळला तर वरील सर्व गोष्टी वेगाने व जास्त तीव्रतेने अनुभवास येतात.

निसर्गात घडणाऱ्या सर्व गोष्टीत (ऊन, पाऊस, वारा वगैरे) हेतू (स्वार्थ नव्हे) दडलेला दिसून येतो. तो हेतू साध्य होण्यासाठी निसर्ग आपली सर्व शक्ती पणाला लावत असतो हे पण आपल्याला (प्रयत्न केल्यास) जाणवू शकते. पण त्या हेतू प्रमाणेच सर्व घडले पाहिजे अशी अपेक्षा मात्र त्यात दिसून येत नाही. आग्रह तर अजिबातच नाही. असो.

श्लोकातील "कर्मफलेहेतू" या शब्दाचा संपूर्ण अर्थ लक्षात न घेता फक्त "हेतू" या शब्दावरच जर जास्त भर दिला गेला तर मात्र गोंधळ उडण्याची शक्यता संभवते.

"पुनर्जन्म" या संकल्पनेवरील कोणत्याही चर्चेत मी भाग घेणार नाही आहे. कारण वादे वादे जायते तत्त्वबोधा असे काही एक होण्याची शक्यता त्यात नसते. कारण परीक्षानळीत घालून पुनर्जन्माचा सिद्धान्त सिद्ध करता येणे शक्य नाही हे मला पटलेले आहे. मी पुनर्जन्म मानतो अथवा नाही यावरही मला माझे मत मांडावयाचे नाही. ज्याने त्याने विचार करावा व आपले मत निश्चीत करावे. असो.