मी आता जे सांगणार आहे त्यामुळे थोडा रसभंग होईल म्हणून आधीच 'क्षमस्व' असे म्हणत आहे.

पुलंच्या एका पुस्तकात (बहुतेक "नस्ती उठाठेव" किंवा "खोगीरभरती") त्यातील एक व्यक्ती व्युत्पत्तीशास्त्राची थोडी चेष्टा करते. ती मी इथे देत आहे. तपशील अगदी तंतोतंत बरोबर नसेल कदाचित, पण एकूण गोषवारा देत आहे.

'गर्दभ' हा शब्द 'गंधर्व' शब्दाचा अपभ्रंश आहे.

गंधरव > गंधरब > गधरब > गरघब > गरदभ > गर्दभ

गंधर्व हा शब्द मुळात गंधरव असा आहे. म्हणजे ज्याच्या रवाला किंवा आवाजाला (सु)गंध असतो तो. म्हणजेच ज्याचा आवाज चांगला असतो तो.

नंतर व चा ब झाला (जसे वंग चे बंग होते.) व तो गंधरब झाला.

गंधरब मधील ग वरचा अनुस्वार नाहीसा झाला (कोल्हापुरात रंकाळं नावाचं तळं आहे. त्याचा उच्चार बरेच लोक 'रकाळं' असा करतात तसे.) आणि तो गधरब झाला.

पुढे ध आणि र ची अदलाबदल होऊन तो गरधब झाला. (ग्रामीण बोलीत जसे 'नुकसान' ला 'नुसकान' म्हणतात तसे.)

नंतर ध मधील महाप्राण ब मध्ये गेला आणि तो गरदभ झाला. ( जसे ९०% लोक आम्हाला फाटक ऐवजी पाठक म्हणतात. [पुलंनी दिलेले उदाहरण आठवत नसल्याने हे स्वानुभवाचे उदाहरण दिले आहे.])

मग सरकार चा उच्चार जसा सर्कार होतो तसा गरदभ चा उच्चार गर्दभ झाला.

---------------------------------------------