एक, विचारानं किंवा दोन, भावनेनं. अत्यंत सरळ आणि शुद्ध ज्ञानानं पाहिलं तर देव, आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म, सत्य, कैवल्य आणि जे जे काय म्हणून उच्चारता येईल ते ते फक्त शब्द आहे आणि बहुतेक जण शब्दाचे अर्थ काढण्यात गुंतले आहेत; हे शब्दात अडकणं झालं कारण शब्द मुका आहे  आणि अर्थ तुम्ही म्हणाल तसा आहे. त्यामुळे शब्द जमवून जीवनात स्वास्थ्य येत नाही. एकदा हा अर्थ बरोबर वाटतो एकदा तो अर्थ बरोबर वाटतो आणि आपण होतो तसेच राहतो.

दुसरा भाग भावनेचा आहे त्याचा संबंध हृदयाशी आहे म्हणजे 'मृत्यू' हा शब्द आहे पण तो उच्चारल्यावर ज्याला ती भाषा कळते त्याच्या हृदयात जाणिवेचा कंप निर्माण होतो. भावनेतून बाहेर येणं हे जास्त कौशल्याचं असतं.

आता मृत्यू ही वास्तविक घटना देखील असू शकते. समजा एखादी व्यक्ती गेली तर ती एक फिजीकल घटना असते जर आपला त्याच्याशी काही संबंध नसेल तर आपण 'हो का? वाईट झालं! ' म्हणून कामाला लागतो, विसरून जातो, अडकत नाही. जर आपला आर्थिक हित संबंध असेल किंवा इतर सोयींवर त्याचा  परिणाम होणार असेल तर विचारानी तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो. आपल्या नात्यातलं किंवा घरातलं कुणी असलं तर आपण भावनिक दृष्ट्या त्या प्रसंगात अडकतो. प्रसंग तोच असतो पण आपलं त्यात गुंतणं वेगवेगळ्या प्रकारे असतं. 

पण तुम्ही कधी बघितलंय? आपल्या मृत्यूचा तर आपण विचार देखील करू शकत नाही. वरवर बघता हे साधं वाटतं पण याचं एक फार खोल अंतर्मनात रुजलेलं कारण आहे ते असं की आपण मरत नाही, निराकाराला मृत्यू नाही. आपण नेहेमी जसेच्या तसे राहतो,  मग मृत्यू संबंधीताचा असो, परक्याचा असो की खुद्द आपला असो त्यानी काही फरक पडत नाही;  हा बोध, हा अनुभव तुम्हाला जाणिवेचं विचारात आणि विचाराचं भावनेत रुपांतरण होण्यापासून वाचवतो आणि तुम्ही प्रसंगात अडकत नाही.

संजय