खरं तर सुटात सुटसुटीत वाटतच नाही. बऱ्याच वेळा असे दिसून येते कि काही जण स्वतःच्या लग्नानंतर लगेच वर्ष दीड वर्षात आलेल्या मित्रपरिवारातील आणि नातेवाईक मंडळी पैकी कुणा कुणाच्या लग्नात आपल्या लग्नातला सुट घालून उगिचच मिरवत असतात. त्यामागे हेच कारण असावे कि आता वापरून टाकुया. पण खरं तर आपल्याकडे (निदान मुंबई आणि उपनगरे) हवा पण सुट घालून सुखकारक वाटेल अशी नसते आणि त्यात बरिचशी लग्न ऐन उन्हाळ्यात असतात. तरिही केवळ स्टेटसच्या भ्रामक कल्पनांमुळे आणि अनुकरण करण्याच्या नादात सगळेच लग्नात सुट शिवून घेतात. बरेच वेळा वराचा पोषाख वधुपक्षाकडून मानाचा / कौतुकाचा / वगैरे म्हणून देण्यात आलेला असतो आणि तो त्या भावनांचा आदर करायचा म्हणून घेतलाही जातो, घातलाही जातो... पुढे बरेच जण त्या सुटापैकी फक्त पॅंट वापरून टाकतात, कोट फुकट घालवतात. थंडी वगैरे मस्त असेल तर कोटाचा उपयोग योग्य ठरतो - तेव्हा गोष्टच निराळी.
मी हे त्रयस्थपणे लिहिले कारण मी तसे केले नव्हते! माझ्या लग्नाच्या वेळेस सासरच्या मंडळींच्या आग्रहाला बळी न पडता मी फक्त शर्ट पॅंट (त्यांचा आग्रह होता म्हऊन टाय देखिल! ) एव्हढ्याच गोष्टींचा स्विकार केला आणि त्याच कपड्यात वावरलो. त्या नंतर माझ्या चार मित्रांनि देखील त्यांच्या लग्नात माझा कित्ता गिरवला! एकाने तर सासरच्या मंडळींचा अतीच आग्रह चालला होता तेव्हा स्पष्ट सांगितले "तुमचा खर्च करणाचाच आग्रह असेल आणि त्यावाचून अडत असेल तर मला चार चार जोड्या कपडे घ्या, मी तासा तासाला बदलेन, नाहीतरी उन्हाळा असल्याने आणि कार्यालय एसी नसल्याने मी घामाघुम होणारच आहे. पण कोट मात्र घालणार नाही. प्लीज, ऐका माझं! " आणि गम्मत म्हणजे त्या मंडळींनि सुद्धा कमाल केली आणि त्याला चार जोड्या शर्ट पॅंट च्या दिल्या, त्या पठ्ठ्याने त्या बदलून बदलून घातल्या देखील!
तेव्हा, अश्या कुठुनतरी नकळत आपल्याकडे आलेल्या रितींना आपण जमेल तसे वळण लावणे गरजेचे आहे! अर्थात, यासाठी विचारांचे वेगळेपण आणि ते अंमलात आणण्याचे थोडेसे धाडस हवे!
पण,
दुसरा विचार (अर्थात समाजातल्या लोकांचा - माझा नव्हे) असाही आहे, कि स्वतःच्या लग्नात छान छान कपडे घालून मिरवायचे नाही तर कधी? - शेवटी प्रत्येकाला काय हवे तेच तो करणार. तेव्हा काय बरोबर आणि काय चुक ते आपले आपण ठरवावे हे उत्तम.