कोणत्याही क्षणी काहीही करतांना प्रत्येक माणसाकडे नेहेमी दोन पर्याय असतातः

एक : आधी विचार आणि मग कृत्य, म्हणजे आधी आत शब्द किंवा वाक्य उमटतं आणि मग त्या अनुषंगानी आपण कृत्य करतो, जगातले जवळजवळ सर्वजण याच पद्धतीनं जगतात. ही जगण्याची पद्धत जीवनाच्या रथाचं सारथ्य मनाकडे देते, मन पुढे आणि आपण मागे असा हा रथ चालतो आणि म्हणून कृत्यातली आणि पर्यायानी जगण्यातली सगळी मजाच निघून जाते. कामचं टेंशन, जे फक्त माणसाला आहे, त्याचं मूळ कारण हे आहे!

दुसरा पर्याय जो देखील प्रत्येक क्षणी आणि प्रत्येकाला उपलब्ध आहे तो म्हणजे इंट्यूशननी (अंतःप्रेरणेनं)  कृत्य करणं, म्हणजे आत काही वाक्य उमटत नाही, तुम्हाला तसं करावसं वाटतं आणि तुम्ही ते करता. या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा अनुभव म्हणजे कृत्य करतांना तुम्ही स्वतःशी संलग्न असता, तुम्हाला अजीबात टेंशन येत नाही. तुम्ही या प्रक्रियेत समग्र बुडालात तर मी 'कर्मण्येवाधिकारस्ते' मध्ये जे लिहलंय ते तुम्ही अनुभवता : तुमच्या लक्षात येतं की कृत्य घडतंय, आपल्याला कळतंय पण आपण काही करत नाहीये!

तुम्हाला मजा सांगतो, आपल्याकडे या स्थितीला समाधी असा शब्द आहे पण त्याचा पर्यायी इंग्रजी शब्द 'इक्स्टसी' असा आहे. इक्स्टसी चा अर्थ 'टू स्टँड आऊट' असा होतो, तुम्ही घटनेतली एक उपस्थिती होता, साक्षी होता! आणि जीवनात धमाल सुरु होते, तुम्हाला जीवन चित्रपटा सारखा वाटायला लागतं कारण घडंत सगळं असतं, तुम्हाला कळंत देखील असतं पण प्रत्यक्ष तुम्हाला काही होत नाही! जीवनातली सगळी उद्विग्नता संपलेली असते.

आता तुमचंच उदाहरण घेऊन विचार आणि इंट्यूशन मधला फरक बघू: 

एक : विचारा मागून कृत्य केलं तर असं होतं : 'कपाला धक्का मारायचा विचार माझ्या मनात कसा आला? मग मी आणि कप समोरासमोर कसे आलो? माझा जन्म झाला म्हणून मी धक्का मारू शकलो, मग माझा जन्म कसा झाला? एवढ्या मोठ्या लोकसंख्येत माझ्याच आई-वडीलांनी एकमेकांना कसं निवडलं? मग त्यांचा जन्म कसा झाला? हे पार जगाच्या सुरुवातीला नेता येतं आणि सगळं झालं की परत कप तिथे कोणी ठेवला? पासून सुरुवात करता येते! अशा पद्धतीनं तुम्ही कायम संभ्रमात राहाल आणि शेवट पर्यंत आपण असं कां केलं हे तुम्हाला सांगता येणार नाही!

दोनः  इंट्यूशन मध्ये असं होतं : मला कप समोर दिसला आणि वाटलं की चला विसळून ठेवू; आता मी, कप, पाणी आणि विसळणं सगळं एकसंध आहे मनात परिणामांची क्षिती नाही, मला कप विसळण्याची आणि तो पुसून जागेवर ठेवण्याची मजा आली; विषय तिथेच संपला!

पहिल्या पर्यायात कपाला धक्का मारला तरी बरोबर करतोयं का ही धास्ती, कप फुटल्यावर पुन्हा निस्तरायला लागण्याचा ताप आणि एवढं करून परत 'कप आणि धक्का' मनात चालूच!

मी हा लेख लिहील्यावर माझा मित्र घरी आला आणि तो म्हणाला ' आयला! तुला ही 'देव आणि गुरुत्वाकर्षण' भानगड कशी सुचली?'  मी म्हटलो 'मी काही वाचलेलं आठवून लिहीत नाही मला ऐनवेळी काही तरी सुचतं आणि मी लिहून मोकळा होतो! ' मग मी जेव्हा परत कधी  काय लिहीलंय ते वाचतो तेव्हा मला ही हाच प्रश्न पडतो की कसं सुचलं असेल? पण तेवढ्यात कुणी तरी नवा प्रश्न मला विचारतं आणि परत मला काही तरी नवीन सुचलेलं असतं!   

संजय