माझ्या मेव्हण्याचं नुकतंच लग्न झालं होतं आणि ते मी इतक्या त्वरेनी जमवलं होतं की त्याची बायको, (म्हणजे माझी वहिनी, असं सध्या म्हणूया कारण माझा नातेसंबंधांचा अभ्यास नाही) आणि तिचे बाबा माझ्या उत्सफूर्ततेवर खूष होते (अजूनही आहेत). सगळं सुरळीत चालू असतांना अचानक न्युमोनिया होऊन तिची आई गेली, आईचं वय जास्तीत जास्त पंचेचाळीस असेल. आता घरात वडीलांची वृद्ध आई, वहिनीचा धाकटा भाऊ (तो एकविसचा असेल) आणि तिचे बाबा उरले; सगळ्यात मोठं नुकसान वहिनीच्या बाबांचं झालं कारण त्यांचा जमून आलेला डाव मोडला, भविष्य शून्य झालं! मी शक्यतो कुणी गेल्यावर तिथे माझा काही उपयोग होणार असेल तरच जातो पण हे नातं इतकं रोजच्यातलं होतं की मला जाणं भाग होतं. मी गेलो तर माझे सासरे, सासू, मेव्हणा, ही वहिनी, तिचा भाऊ आणि तिचे बाबा सगळे मृत आई सभोवती सुन्न होऊन बसले होते. बाबा जणू माझीच वाट बघत होते.
मी गेल्यागेल्या ते मला म्हणाले ‘संजयबाबू आता द्या याचं उत्तर’.
मी क्षणभरच विचार केला आणि म्हणालो: ‘बाबा याला उत्तर नाही पण तुम्ही हे मान्य केलंत तर या क्षणी प्रसंगातून बाहेर याल’
सगळ्या वातावरणात अशी काही गंभीर शांतता पसरली की पुढच्या क्षणी काय होईल याचा कुणाला अंदाज येईना. बाबा सावकाश उठले माझ्या जवळ आले, मला मिठी मारली आणि म्हणाले, ‘चला बोलवा अँब्युलन्स’. एका क्षणात सगळं वातावरण बदललं.
संजय