हे लेखन वाचले आणि कुतुहल म्हणून जालावर 'जोक्स ऑन हिटलर' असा शोध दिला. तेथे तर याहून सुन्न करणारे विनोद आणि अगदी घाणेरड्या पातळीपर्यंत पोचलेले वाद वाचायला मिळाले.
पण यात एक बाब समजून घेतली पाहिजे, की आपण कितीही निषेध केला तरी कुठेतरी या ना त्या रुपाने हे चालूच राहाते. अगदी मनोगतावर घमासान चर्चा झाली तरी त्यामुळे 'झी मराठी' काही 'फू बाई फू' बंद करणार नाही. मग आपल्या अरण्यरुदनाचा काय उपयोग? आपल्या हातात केवळ ती वाहिनी किंवा तो कार्यक्रम पाहणे बंद करणे इतकेच राहते. ज्याने त्याने आपली मनोवृत्ती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, हे उत्तम.
विनोदामुळे एखाद्याच्या मनाला जखम होऊ शकते तसा विनोदाचा वापर प्रतिकारात्मक आणि दुसऱ्यावर बाजू उलटवण्यासाठीही होतो. एका बागेत एका रिकाम्या बाकावर एक माणूस ऐसपैस बसला होता. दुसरा माणूस जवळ गेला आणि त्याने कुजकटपणे विचारले, 'का हो? हा बाक फक्त कुत्र्यांना बसायला राखीव आहे का? ' त्यावर मुळीच न चिडता बसलेला माणूस जरासा सरकून बसला आणि स्मित करून म्हणाला, ' तसेच काही नाही. डुकरेपण बसू शकतात इथे. आपले स्वागत आहे.'
काही वेळा प्रत्यक्ष ज्यांच्यावर विनोद होतो ते त्याला कसे घेतात, हे महत्त्वाचे ठरते. मारवाडी, ज्यू, कोकणस्थ ब्राह्मण यांच्या कंजूषपणाचे अनेक किस्से रंगवून सांगितले जातात. हे समूह असे विनोद हलके घेतात. कारण ती अतिशयोक्ती आहे हे सगळ्यांना माहीत असते. (वास्तवात या जातींच्या व्यवहारीपणामुळे अनेक उद्योग उभे राहिले आहेत, हे सत्य नाकारता येत नाही) तीच गोष्ट सरदारजींबाबत. विनोदांमधून हे लोक निर्बुद्ध रंगवले गेले तरी प्रत्यक्षात ही जात मेहनती आणि कामाकडे लक्ष देणरी आहे. (त्यामुळेच त्यांच्यात कुणी भीक मागत नाहीत, हे वास्तव आहे.)
हिटलर आणि होलोकास्टचा मुद्दा थोडा बाजूला ठेऊ. विचार करा. आपण एखादी गोष्ट कुठल्या बाजूने बघणार आहोत?
बब्बन खानच्या 'अद्रक के पंजे' नाटकात एक प्रसंग आहे. महागाई आणि गरीबीने गांजलेल्या घरधन्याचा मुलगा धावत येतो आणि सांगू लागतो, 'अब्बा. दादी पाय घसरून संडासात पडली.' त्यावर तो नायक अभावितपणे बोलून जातो, 'अरे मग सांगायला कशाला आलास? साखळी ओढायची नाहीस का? ' या संवादावर लोक हसतात. हा विनोद ब्लॅक ह्यूमर आहे. हसत असताना पण आपल्या काळजात कळ उमटते. त्या गरीबीने, वैफल्याने आणि हताशतेने प्रेक्षक अंतर्मुख होतो. गरीबीची इतकी क्रूर थट्टा का उडवली? म्हणून कुणी संतापू शकेल, पण आजवर तसे झालेले नाही.
हिटलरचे विनोद वाचून, ऐकून हसणारी माणसेही त्यातील अव्यक्त सत्य मनापर्यंत पोचते त्यावेळी क्षणोक्षणी अंतर्मुख होत असतात. या ठिकाणी विनोद त्यांना विकृत नव्हे, तर उलट अधिक संवेदनशील व माणुसकी जागवणारा बनवत असतो. (हे अर्थात माझे मत माझ्या अनुभवावरुन. इतर लोक असहमत असू शकतील)