सदर चर्चेबाबत मी ''फू बाय फू'' च्या स्कीटस चे लेखक ''कौतुक शिरोडकर'' यांचेशी चर्चा केली.... त्यांनी मनोगत वर येउन प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला... परंतु एरर येत असल्याने त्यांचं मत त्यांनी ज्या शब्दांत माझ्या विपुत मांडलंय ते जसेच्या तसे आपल्या अवलोकनार्थ ठेवत आहे..

डॉ. कैलास.




कौतुक शिरोडकर
1 September, 2010 - 11:01
नमस्कार कैलासजी, आपण दिलेली लिंक पाहीली. तिथे प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला पण 'क्लिक' केल्यावर 'एरर' दाखवला जातोय. म्हणून पुन्हा तुमच्याकडे सगळा प्रपंच घेऊन आलोय.
लग्नापुर्वीची प्रेयसी लग्नानंतर बायको होते आणि पुरुषाच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला येतो ही ओरड बहुश्रूत आहेच. सर्वसामान्य तर यातून रोज नवे ताप भोगतात. पण अशी स्त्री जर हिटलरला मिळाली तर त्याच काय होईल ? किंबहूना त्याच्या आत्महत्येला एक वेगळा विनोदी एंगल का देऊ नये ? या विचारातून या कल्पनेचा जन्म झाला. परेग यांनी नमूद केलेलं वाक्य माझ्या स्कीटमध्ये नव्हतं. पण त्यामुळे माझं उत्तरदायित्व संपत नाही. शेवटी या कल्पनेचा कर्ता मी आहे.
हिटलरने केलेली हत्याकांडे मी वाचलीत. त्यावरचे सिनेमेही पाहीलेत. परेग यांच्या इतकी नसली तरी संवेदनशीलता माझ्याकडे आहे. त्यामुळे कुणाच्याच दु:खांचे भांडवल करून मला पोट भरण्यात रस नाही. ते वाक्य स्कीटमध्ये टाकण्यात येण्याचं मुख्य कारण होते की हिटलरला तो जे करत होता ते नीट कळत होतं आणि त्याच्या क्रुर व्यक्तीमत्वाचा तो पैलू लोकांपर्यंत पोहोचावा हा त्यातला मतितार्थ. फूबाईफू बघणार्‍या शहरी लोकांना हिटलर माहीत असला तरी खेडेगावात कितीसा माहीत असणार. म्हणून ते स्कीट 'डिस्क्रीप्टीव्ह' केलं होतं. यात जर्मनीचा उल्लेख, हिटलरचे हुकूमशहा असणे वगैरे. काही गोष्टी एडीटमध्ये गेल्यात तो भाग वेगळा. असा हिटलरसारखा माणूसदेखील ठमीसारख्या मराठमोळ्या मुलीशी लग्न करून आत्महत्या करण्याइतपत पस्तावला असेल हे कथेच सार.
स्वतः श्री. वैभव मांगले हे निव्वळ नट नसून त्यांनी हिटलर वाचलेलाही आहे. मालिकेचे दिग्दर्शकही विद्याविभुषित आहेत. त्यामुळे ते वाक्य हिटलरच्या तोंडी फक्त हिटलरचा इतिहास आणि तिच्यासमोर त्याची हतबलता हे दर्शवण्यापुरती होते.
इतरांनी जे मतप्रदर्शन केलं आहे. तो त्यांच्या वैयक्तीक आवडीनिवडीचा भाग असल्याने त्यावर बोलण्याची माझी इच्छा नाही. माझ्या माहीतीप्रमाणे कोणाच्याही भावना न दुखवता निखळ विनोद देण्याचा निर्मात्यांचा व वाहीनीचा प्रयत्न आहे. कार्यक्रमाला टीआरपी आहे त्याला कारणही तेच.
सरतेशेवटी एवढेच म्हणेन की रिमोट तुमच्या हातात आहे. जे योग्य तेच पहाण्याचा आपल्याला अधिकार आहे.
कैलासजी, तुम्ही लिंक दिल्याबद्दल आभार. मी माझ्या चुका शोधण्यात मग्न असतोच. पण तुम्हीही त्यावर नजर ठेवून आहात याचा खरचं आनंद आहे. याचा फायदा शेवटी मलाच आहे. याउपर कुणाला माझ्याशी याविषयावर संपर्क साधायचा असेल तर माझ्या संपर्काची माहीती तुमच्याकडे आहेच.

--कौतुक शिरोडकर