मंदार तुझे प्रश्न आणि त्याला उत्तरं!
१) "एकूण वरील वाचून असे वाटते, की माणसाने माणुसपणापासून जास्तित जास्त दूर जाणे म्हणजे अध्यात्म. "
ऊ: नाही! आपलं निराकार स्वरुप समजणं म्हणजे आध्यात्म!
२) प्राणी विचार करू शकतात की नाही हे माहीती नाही, पण प्राणी 'उद्याचा' किंवा एकुणच भविष्याचा विचार करत नसावेत. भविष्यासाठी बेगमी (मुंग्या माश्या अपवाद) करण्याची फारशी पद्धत नाही त्यांच्यात. भविष्याची बेगमी करणारे प्राणीही कित्येक पिढ्या त्याच प्रमाणे वागत आले आहेत, आजुबाजुच्या वातावरणात बदल घडल्यास आपल्या सवयींमध्ये बदल करून घेण्यात ते कमी पडतात, आणि त्यांची संख्या घटते.
ऊ: प्राणी जाणिवेनं जगतात त्यांना स्मृती जुजबी असते आणि माणूस स्मृतीतून जगतो, जाणिवेचा उपयोग करत नाही हा फरक आहे. जाणिव हा आपला अस्तित्वाशी असलेला संपर्कबिंदू आहे, विचार नाही.
वातावरणातल्या बदलाशी समायोजन करणं आणि टिकणं हा तुम्ही निसर्गाशी किती जवळ आहात किंवा तुमची जाणिव किती तीव्र आहे यावर अवलंबून आहे. सुनामी येणार ही जाणिव तिथल्या माणूस सोडता सर्व सजीव सृष्टीला झाली होती आणि त्यांनी तिथून आधीच स्थलांतर केलं होतं आणि सगळ्यात जास्त हानी माणसाची झाली! पण या लेखनाचा हेतू: विचारात न हरवता जाणिवेनी जगणं असा आहे
३) तर असा पुढील विचार करणे, एका पीढिने मिळवलेले ज्ञान दुसर्या पीढिला देणे, आणि दुसरीने त्यात भर टाकणे, कसलीतरी चिंता करणे, हे माणसाचे गुणधर्म आहेत. आता तेच नेमके करू नये असे एकूण लेखमाल वाचून वाटते.
ऊ: उद्याची चिंता हा माणसानी विचारामुळे स्वतःला लावून घेतलेला त्रास आहे, उद्या हा फक्त कल्पनेत आहे, जगायला नेहमी आणि सदैव फक्त एकच क्षण आहे आणि तो आता आहे. एकानं मिळवलेलं ज्ञान दुसऱ्याला देणं आणि पुढची चिंता करणं या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चिंता हा माणसाचा इतका स्थायी भाव झाला आहे की कसलीच चिंता नाही म्हणजे काही तरी चुकतंय असं त्याला वाटायला लागतं!
४) अंदमानात राहणारे आदीम लोक, जे पीढ्यानुपीढ्या होते तसेच आहेत ते, आपल्या सारख्या प्रगतीशील (आता याला प्रगती म्हणायचे की नाही हा वाद बाजूला ठेवू) लोकांपेक्षा अध्यात्मात अधिक 'पोचलेले' आहेत का?
ऊ: प्राणी, पक्षी, झाडं, आदीमानव सगळे निसर्गाशी एकरुप आहेत म्हणून निश्चींत आहेत आणि म्हणून पोहोचलेले वाटतायंत, ज्ञानी निश्चींत आहे कारण त्यानी निराकाराला जाणलंय, आपण मरणार नाही हे त्याला माहिती आहे, सत्य न गवसलेला माणूस चिंतेत आहे कारण जीवनाची अशाश्वतता त्याला समजली आहे!
४) मनाच्या 'विचार शुन्य' अवस्थे विषयी. अनुभव नसल्याने अशी शंका येते..
विचारशुन्य अवस्था एखाद्या निरोगी व्यक्तीला खरोखर साध्य आहे का? आपल्याला होणारी अंतःप्रेरणा सुद्धा एक वेगळ्या पातळीवरचा 'विचार' च असतो. फक्त तो एवढा भरभर होतो, की तो शब्दबद्ध होत नाही.
ऊ: मेंदूत विचार नाही हे आपल्याला समजतं, मेंदूला नाही. ही अत्यंत प्रेयस अवस्था आहे तुम्हाला इतकं शांत वाटतं की बोलायची सोय नाही.
अंतःप्रेरणा आणि विचार एक नाही, अंतःप्रेरणा इतकी उत्कट असते की तुम्हाला संभ्रमच वाटत नाही, तुम्ही अत्यंत सहज त्या दिशेनी वाटचाल करता आणि कायम मजेत राहता. विचारात तुम्हाला कायम अनिश्चीतता वाटत राहते.
५) सर्व साधारणपणे विचार हे शब्दात होतात, आणि ते फार वेळखाऊ काम आहे. अत्यंत अटीतटीच्या वेळी अशी अंतःप्रेरणाच कामास येते, कारण तेवढाच वेळ असतो. पण माणसाने आपले जगणे एवढे समृद्ध/किचकट करून ठेवले आहे की केवळ अंतःप्रेरणेने केलेले विचार जगरहाटी चालवण्यास पुरत नाहीत, म्हणून आपण भाषा वापरून विचार करत बसतो.
ऊ: अंतःप्ररणेनी जगणं हे जगरहाटी चालवणं, बोलणं आणि केव्हा काय करायचं ते ठरवणं सगळ्यालाच उपयोगी आहे. मी आता हे उत्तर पूर्णपणे अंतःप्रेरणेनी, काहीही विचार न करता आणि तरी ही भाषेचा सुयोग्य वापर करून लिहीतो आहे, कुठे अडथळा आहे, काय संभ्रम आहे?
६) तर विचारशुन्य अवस्था खरोखर शक्य आहे का? विचारशुन्य अवस्था यदाकदाचीत साधलीच, तर ते समजेल का? कारण 'समजण्यात' कुठेतरी मेंदुचा वापर होणारच.
ऊ: ‘अनिर्बंध विचार’ हेच सर्व टेंशनचं मुळ कारण आहे कारण सर्व विचार प्रक्रिया शरीराला आवश्यक असणाऱ्या श्वासावर चालते आणि शरीराला श्वास कमी पडल्यानी हृदयावर ताण येऊन विचारांचं भावनेत आणि मग भावनेचं भयात रुपांतर होतं.
मेंदूत विचार नाहीत हे आपल्याला समजतं मेंदूला नाही हे वर लिहीलं आहेच.
समोर बघणं जाणिवेचं विचारात रूपांतर होऊ देत नाही हा या लेखाचा हेतू आहे
७) कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है... कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है
के क्यों... कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है!
ऊ: इन खयालोंपे मेरा बस हो गया
मैं सोचूं, न सोचूं मेरा हक हो गया!
पहेले था सब उलझा-उलझासा
अब जिंदगी का रंग कुछ और गया!
संजय