शेवटी ५ च्या शाळेचा पहिला दिवस आला. मी माझ्या मुलाला घेऊन वर्गात गेलो. वर्ग शिक्षिकेने सांगितले की या वर्षापासून इतिहास आणि भूगोलसुध्दा इंग्रजीमध्ये असलेला पर्याय उपलब्ध असेल. ज्या पालकांना वाटते की त्यांच्या मुलांना इंग्रजी झेपेल त्यांनी इंग्रजीचा पर्याय द्यावा आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना मराठीचा पर्याय उपलब्ध असेल. आणि ही सूचना उद्याच्या उद्या द्यावी लागेल.
मी विचारले की येथे झेपण्याचा प्रश्नच कोठे येतो? आम्ही काळाच्या प्रवाहाच्या विरुद्ध आमच्या मुलांना मराठी माध्यमात टाकले आणि त्यामागे एकच हेतू होता की मराठी मध्ये ( मातृभाषेमध्ये ) माणसाचे विचार / कल्पना पक्क्या होतात, शेवटी माध्यमिक शिक्षणानंतर इंग्रजीमध्ये टाकण्यास आमची काही हरकत नाही. शेवटी तुमचा उद्येश स्तुत्य असला ( मुलांना इंग्रजीची आतापासूनच ओळख व्हावी ) तरी त्यांना गणित आणि शास्त्र इंग्रजीमध्ये असल्या कारणे त्यांचा थोडाफार या परकीय भाषेशी तोंडओळख होणारच आहे ना? अकारणच आमची मुले या प्रयोगातून ना इकडची ना तिकडची असे होऊ नये अशी आमची इच्छा आहे.
बरीच चर्चा होऊन माझ्या माहिती प्रमाणे शेकडा ८५ % मुलांनी मराठी माध्यमाचा स्वीकार केला आहे असे कळते.
द्वारकानाथ