पूर्वी मुंज हा ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णांतील एक महत्त्वाचा संस्कार होता. त्यामुळे प्रत्येकाच्या गळ्यात जानवे असे. कालांतराने इतर वर्णांनी हा संस्कार सोडून दिला आणि सध्या तो ब्राह्मण जातीतील मुलांपुरता मर्यादित संस्कार उरला आहे. (खानदानी मराठा, सोनार, शिंपी, वैश्यवाणी अशा इतरही जातींत हा संस्कार टिकून आहे, पण त्याचे प्रमाण तुरळक आहे) आता तर ब्राह्मण समाजातही मुंजीची तितकीशी आवश्यकता असल्याचे मानले जात नाही. ज्यांना हौस असते ते मुलाची मुंज करतात. ते नाटक आठ दिवस टिकते. मुलांना तो तुळतुळीत गोटा घेऊन शाळेत गेलेले आवडत नाही. इतर मुले टपला मारतात-चिडवतात म्हणून मुले पंधरा दिवस शाळेत जात नाहीत. संध्या करत नाहीत, गायत्री मंत्र जपत नाहीत. जानवे कधीतरी बनियन काढताना त्याच्यासह काढले जाते आणि नंतर पुन्हा घातले जात नाही.

तुम्ही मुलांची मुंज केलीत तर कुणी तुमचे कौतुक करणार नाहीत किंवा नाही केलीत तर निंदाही करणार नाहीत. हा संस्कार हा तुमचा वैयक्तिक निर्णय असतो. त्यात इतकी जाहीर चर्चा करण्यासारखे काय आहे, हे समजले नाही.