काही चालीरीती, प्रथा, संस्कार, विधी हे पिढ्यानुपिढ्या चालत आलेले दिसतात. नको असलेले झुगारून देण्याचा निर्णय घरातला कुणीतरी- पाखंडी, वेड्यासारखा, काय मूर्खासारखा इ. शेलकी विशेषणे पदरी घेऊन-धाडसाने जाहीरही करतो. त्यामुळे बिघडत कुणाचे नाही, काही वाईट घडत नसते- फक्त हरवते ते मानसिक समाधान-घरातल्या वडीलधाऱ्या माणसाचे अथवा घरातल्याच कर्मठ विचाराच्या माणसाचे.त्यांच्यासाठी म्हणून मुंज करावी. संस्कारासाठी त्यांना मुंज आवश्यक वाटते.अन्यथा काही फरक पडत नाही. अस्थानी धाडसाचा निर्णय आपण घेऊ शकत नाही, कारण आपल्यावर झालेल्या संस्काराचा पगडा. कितीतरी प्रथा कालबाह्य आपणच करत आहोत. शेंडी राखणे, जानवे घालणे, सोवळ्याचा अतिरेक इ.! अशा सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेणे. मी अवडंबर न माजवता, इतर नातेवाईकांचा रोष पत्करून, देवळात-ज्याला घरच्या घरी म्हणता येईल -अशी माझ्या मुलाची मुंज केली. मुंज केल्याने वैयक्तिक मला काही फरक पडला नाही. किंवा मुलातही जाणवला नाही, पण पत्नी व वडीलधाऱ्यांना वाटलेले समाधान मी कशातच मोजू शकत नाही. कृतकृत्य झाल्याचे समाधान त्यांना वाटले.