आजच्या युगातही भारतात (आणि इतर देशातही) राष्ट्रीय 'सणांच्या' दिवशी संचलन वगैरे होते. कधी काळी यात हत्तीदळ, घोडदळ असेल. आता संपूर्ण भारतीय बनावटीचे रणगाडे ते क्षेपणास्त्रे इ. असतात. हे पाहून ज्याचा उर अभिमानाने भरून येतो, त्यावर देशप्रेमाचे 'संस्कार' झालेले असतात, आणि त्याना अशा 'कर्मकांडातून' बळकटी मिळत असते. बाह्यांग कालानुरूप बदलले, तरी आंतरिक भाव बदलत नाही. ज्याची नाळ या मातीशी जोडली गेली आहे त्याच्या बाबतीतच हे शक्य आहे. तशी तुमची नाळ वैदिक धर्माशी जोडली गेली असेल, तर आपणास यथायोग्य वाटेल असे बाह्यांग ठेऊन विशुद्ध आंतरिक भावनेने व्रतबंध करून पहायला हरकत नाही. असो.

निव्वळ 'प्रोसेस' असे बघाल तर सारे अनावश्यक वाटेल, आणि राष्ट्रपतींच्या घरी एका जवानाने जाऊन सलामी द्यावी, आणि बाकी प्रोसेस (टाळावी) असल्या प्रकारचे निष्कर्ष निघतील. मग राष्ट्रगीत चालू असताना उभे राहिलो काय, बसून राहिलो काय दोन्ही 'सयुक्तिक' आहे असे म्हणावे लागेल. असो.

निव्व्वळ तर्काने बघाल, तर पृथ्वी, सूर्यामाला आणि अशी असंख्य ब्रह्मांडे मिळून बनलेले अस्तित्व एकच असताना आणि त्यात चिनी, पाकिस्तानी वगैरे सगळे परस्पर प्रेमभावाने मौजेत राहत असता भारत ही विघातक कल्पना माण्डणे आणि त्या अनुषंगाने देशप्रेम जागवणे इ. विधायक ठरणार नाही. तर्काला तारतम्याची जोड दिली असता थोडे वेगळे दिसेल, मात्र तशी ती देणे ऐच्छिकच आहे. निव्वळ तर्काची निष्पत्ती ही वांझेची संतती असते असे संत म्हणतात, आणि तसा माझा स्वानुभवही आहे. मात्र कसला आग्रह नाही.

अनुभवानेच अंत:प्रेरणेवरही अवाजवी भरवसा ठेवणे मला पटत नाही. सोपे उदाहरण देतो. एखादा कलाकार तीन तास सतारीवर यमन वाजवतो, तेव्हा त्यात एक मोठा भाग परंपरेचा, घराण्याचा असतो. आणि तो उपज अंगाने वाजवण्यास पोषकच असतो. निव्वळ अंत:प्रेरणेने दोन चार मिनीटे फार तर पिपाणी वाजवता येईल, बासरी नाही.  त्यामुळे मी बरेच वेळा अंत:प्रेरणेला तारतम्याची जोड देऊन, विचार आणि भावना यांचा मेळ साधून आणि वडिलधार्यांचा, परंपरेचा सन्मान राखून निर्णय घेतो.

गेले वर्षभर माझा मुक्काम नोकरीनिमीत्त परदेशी आहे. हा लोकशाही देश असूनही इथे चक्क राणी आहे. हे मुळीच सयुक्तिक नसूनही कोण ही राणी, (तिला टाळा) असे इथे कुणाला बोललो तर माझी काय गत होईल हे मला चांगले माहित आहे. तात्पर्य - सत्याचे प्रयोग, सयुक्तिकपणाचे प्रयोग आपल्याच देशात आणि आपल्याच धर्माच्या बाबतीत करणे श्रेयस्कर असे मला अनुभवाने समजले आहे. आपण विचारी आहातच. कधीकधी आपले लेख वाचून आजच्या युगात अपत्याला जन्म देणेच मुळात कितपत सयुक्तिक आहे असाही प्रश्न पडतो. मुंज करावी की नाही, लग्नात अडकून गोची करून घ्यावी की डेटिंग करत मुक्तपणे सुख भोगावे हे फार पुढचे प्रश्न आहेत. तेव्हा विचारी असूनही तूर्तास मला तारतम्यावर विसंबणेच भाग आहे.  असो.

आपणास पु. ले. शु.       

(संपादित : प्रशासक)