बटूने मटणाची नळी चोखणे वगैरे वाचून गंमत वाटली. खरे तर हा स्वतंत्र धाग्याचा विषय होऊ शकेल.
वैदिक काळात सगळेच लोक मांसाहारी होते. त्यातल्या त्यात ब्राह्मण तर मजबूत खात. पुढे बौद्ध आणि जैन धर्माच्या प्रभावामुळे त्यांचे मांसाहारीतून शाकाहारींमध्ये परिवर्तन झाले. यज्ञात मिळालेला बोकड घेऊन जाणाऱ्या ब्राह्मणाला चार ठग कसे फसवतात याची कथा सगळ्यांना माहीत आहे. श्राद्धाच्या वेळी तर मांसाहाराशिवाय पान हलत नसे. पुढे या हिंसेला आणि मांसाहाराला पर्याय काढण्यात आले. धार्मिक कार्यात पशुबळी देण्याऐवजी प्रतिक म्हणून कोहळा कापणे किंवा श्राद्धाच्या जेवणात मांसाहाराला पर्याय म्हणून उडदाचे वडे ठेवणे या गोष्टी सुरू झाल्या. उपनयन झालेल्या बटूने मृगाजिनावर (हरणाच्या कातड्यावर) बसून संध्या करायची असे. पशुहत्या बंद केल्यावर त्याचेही प्रतिक म्हणून जानव्यात हरणाच्या कातड्याचा तुकडा अडकवला जाऊ लागला.
आताही मांसाशन करणाऱ्या ब्राह्मणांना दोष देता येणार नाही. मासे खाणाऱ्या सारस्वतांना आणि मांसाहार करणाऱ्या दैवज्ञांना आजही ब्राह्मण जातीत स्थान आहेच. आसाममध्ये सगळेच ब्राह्मण मांसाहारी आहेत. काश्मिरी ब्राह्मणही मांसाहारी आहेत. तरीही ते ब्राह्मण राहिले आहेत. नव्याने मांसाहार सुरू करणाऱ्या ब्राह्मणांनी जर असा युक्तिवाद केला, की 'बौद्ध आणि जैन धर्माच्या प्रभावामुळे आमची मांसाहाराची मूळ वैदिक परंपरा लुप्त झाली होती तीच आम्ही पुन्हा सुरू केली आहे' तर त्याला आक्षेप घेता येणार नाही. बटूचे नळी चोखणे आणि त्याच्यावरील उपनयन संस्कार यांचा संबंध नाही.