मी नाशिकला वृत्तपत्रीय कामानिमित्त होतो तेव्हा दुपारी आमचे चार-पाच सहकारी जेवणानंतर अर्धा तास लांबवर जात. मला नवल वाटे, की हे लोक दुपारच्या वेळी कुठे भटकायला जातात. शेवटी आमच्या शिपायाने सांगितले, 'अहो ते एकलहरे करायला जातात' मी आणखी बुचकळ्यात पडलो. मग त्याने मला समजावून दिले. नाशिकजवळ एकलहरे येथे औष्णिक वीज प्रकल्प आहे. त्याचे धुराडे कायम भकाभका धूर ओकत असते. त्यामुळे कोणी सिगरेट ओढायला चालला असेल तर समव्यसनीला पुकारतो, 'काय येता काय एकलहरे करायला? '

बैरागी गांजाची चिलिम ओढतात. त्याला ते शंकराचा प्रसाद मानतात. ही चिलिम एकच असते आणि प्रत्येकजण दम मारून पुढच्याकडे देतो. त्यामुळे एक सिगरेट/चिरुट  दोघा-तिघांमध्ये ओढणाऱ्यांना 'बैरागी' म्हणण्याची पद्धत आहे. भांगेला शांभवी म्हणतात भांग प्यायलेल्याची नजर तारवटलेली असते. त्यामुळे एखाद्याने मद्य प्राशन केले असेल व ते दुसरा तिसऱ्याला सांकेतिक भाषेत सांगत असेल तर तो त्या नजरेचे वर्णन 'शांभवी मुद्रा' असे करतो.