चला बर्बाट वरपायला

ही सगळी चविष्ट चर्चा होत असताना मांसाहार का मागे पडावा? सदाशिव पेठेतील जोंधळे चौकातल्या, १०४ वर्षे जुन्या आवारे मराठा खानावळीचा येथे उल्लेख करायलाच हवा. आवारे मराठा खानावळ ही नुस्ती खानावळ नसून एक खाद्य संस्थाच आहे. तुम्ही कुमठेकर मार्गाने पुढे निघाला की लगेच उजव्या हाताला मांसाहाऱ्यांचे हे श्रद्धास्थान लागते.

रात्रीचे ८ वाजले किंवा दुपारचे १२ झाले असले तर बाहेर ब्लॅकसाठी असते तशी गर्दी दिसेल. कदाचित तुम्हाला आत मारामारी होत नाही नाही ना आणि हे सर्व लोक बघे तर नाहीत ना, अशी शंकाही येईल. आणि इथले ग्राहकही जादा करून कामकरी आणि अस्सल मराठमोळे. अगदी इसवी सन १९०१ पासून ही गर्दी अशीच कायम आहे. पण घाबरू नका. गेली कित्येक वर्षे माझ्यासारखा भट येताजाता इथले बर्बाट वरपतो आहे.

बर्बाट हे अजब रसायन आहे. एखाद्या शाहिराला "चला बर्बाट वरपायला" हे गीत स्फुरावे, असे हे वीररसपूर्ण बर्बाट.  अगदी पातळ करीच म्हणा बोलाईच्या मटणाचे किंवा कोंबडीच्या मासाची.  खायला कलेजा लागतो आणि खाताना घामही फुटू शकतो.

कविवर्य नामदेव ढसाळ यांना  आवारे मराठा खानावळीच्या बर्बाटा वरपून अगदी स्वतःच्या आईच्या हातच्या बर्बाटाची आठवण झाली, यात काहीच नवल नाही.

कोणे एके काळी, अगदी आपले सोवळे सोडून दै. केसरीनेही ह्या खानावळीचा उल्लेख केला आहे. कदाचित खुद्द न. चिं. केळकरांपर्यंत ह्या बर्बाटाची कीर्ती पोचली असावी. लक्ष्मी पथाच्या तोंडाशीच केळकरांचा अर्धाकृती पुतळा आहे, हा निव्वळ योगायोग नसावा. अधिक संशोधनाची गरज आहे आणि ह्या संशोधनाची सुरवात बर्बाट वरपून करणे कधीही रुचकर.

चित्तरंजन भट