विषय, लेख आणि प्रतिक्रिया सगळेच बाळाप्पाच्या भडंगासारखे घरंदाज चटकदार आहे!
'दारू पिऊन येतो' याला एक मित्रवर्य "जरा ढकलून येतो" असे म्हणत.
'रमाकांत' (रम पिणारे) आणि 'विश्वासराव' (व्हिस्की पिणारे) ही सांकेतिक भाषा अत्र्यांच्या नावावर खपवली जाते. असेलही खरी.
'श्वेतांबरी'ला "मशाल" असे संबोधण्याची आमच्या मित्रमंडळात प्रथा होती. त्यामुळे एक पेटवावीशी वाटली की बाबू "उषःकाल होता होता, काळरात्र झाली" एवढ्याच ओळी घोळून घोळून म्हणे.
अखिलेश पांडे "लागा चुनरीमे दाग" उगाळत बसे. (बात जब मै करूं, मुंहसे निकले धुआं)
धूम्रपानमंडळाची एकुलती एक महिला सदस्या सुजाता "हरे कृष्ण हरे राम" गायला सुरुवात करी.
परतून वारुणीकडे.
रमप्राशन (आणि तदनंतरचे कोंबडीभक्षण) यांचे कमलाकरच्या मनात इतके अद्वैत जुळले होते की तो 'रम'लाही 'कोंबडी' असेच संबोधत असे. ("जरा कोंबडी घ्यायची का ग्लासभर")
उदयला कोड्यात बोलणे आणि केशवसुतांच्या कविता यांनी समप्रमाणात झपाटलेले असल्याने तो "अमुच्या भाळी लिहीलेली कटकट काय असेल ती असो, जग काय म्हणेल तसे वागू या आणि त्याची पर्वा करू या" असा आडतालात घुसे.
स्वामीने आपल्या तमिळ लहेजात "ये लाल रंग कब मुझे छोड डाले" रेकायला सुरुवात केल्यावर त्याला व्होडकामध्ये टमॅटो सॉस आणि पाणी घालून घरगुती "ब्लडी मेरी" हवे आहे हे कळे.
असो.