मी खूप खर्चीक नाही पण चिरकुटही नाही. तुम्ही म्हणता तसं मी जेव्हा वाटेल तेव्हा वस्तू विकत घेत होतो/ घेतो. मी मेरठला असतानाचा हा अनुभव.

अर्थशास्त्राचे माझे सहकारी प्राध्यापक मला म्हणाले, " काय देशमुखसर यावर्षी किती गुंतवणूक केलीत ? "

"शून्य" मी शांतपणे सांगितलं.

"काय ? म्हणजे तुम्ही कर भरला? किती ? "

"१७००० काही... "

"अरेरे... तुमचे पैसे सगळे वाया गेले. अहो तुम्ही मला विचारलं असतं तर मी तुम्हाला स्कीम्स सांगितल्या असत्या... "

"एक विचारू सर ? "

"हो विचारा ना"

"तुमच्या घरी फ्रीज कधी घेतला? "

"२ वर्षांपूर्वी"

"कूलर ? "   ....... "टीव्ही" ....... मी एक एक करत विचारत गेलो. ते शेवटी चिडले.

"तुम्हाला म्हणायचं तरी काय ? "

"तुमच्या घरी या सगळ्या वस्तू यायला इतके वर्ष लागले, ते मी एका वर्षात घेऊन त्या वस्तूचा आनंद घेतोय. माझे १७००० गेले पण १ लाखाच्या वस्तू एका वर्षात घरी आल्या.  आता पुढच्या वर्षी गाडी घेणार, काय ? "

"............ "

"सर, जे पाहिजे ते वापरणे यासारखं सुख नाही"

"मग तर तुमचे पैसे संपून जातील, मग काय कराल ? "

"मला माझी मिळकत माहिती आहे, त्यानुसार मी खर्च करतो, उगाच २० लाखाची कार घेणे मला परवडणार नाही, हे मला माहिती आहे, पण म्हणून २० वर्ष वाट पाहत बसणे मला पसंत नाही. ३-४ लाखाची घेऊ सध्या, नंतर पुन्हा दुसरी घेता येईल. माझ्या मते आनंद महत्त्वाचा, पैसा किती गुंतवला, हे नाही. आणि देवाच्या कृपेने पैसा खर्च झाला की तो कुठून ना कुठून भरून निघतो. "

पुढे त्यांनी मला ३-४ दिवस बरेच डोस पाजले, पण ते वाया गेले  . महिन्याभरात नवीन वेतनश्रेणी लागू झाली, तर त्यांना आनंद होण्यापेक्षा अधिक बचत कशी करावी याची चिंता लागली होती.  

असो. पैशांची किंमत माहिती असणे, आणि त्याचा योग्य तो (पण मन मारून किंवा उधळेपणाने न करणे) वापर मला आवडतो. माझ्या पासबुकातली रक्कम मला माहिती असते, त्यानुसार मी खर्च करतो. पण उगाच रोजचा रुपया दोन रुपयाचा खर्च लिहून ठेवायचा आणि एक-दोन रुपयाचा हिशोब लागला नाही की रात्रभर विचार करुन झोपेचं खोबरं करणे मला पसंत नाही. {ज्यांना आवडते त्यांनी करावं, त्याला माझा आक्षेप नाही. माझे वडीलही डायरी लिहितात  }

शेवटी डायरी लिहिली काय आणि नाही लिहिली काय, पासबुकातला आकडा बदलणार थोडीच आहे ? मग झोपा ना शांतपणे.