ज्या हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटांच्या चालण्याबद्दल आपण बोलत आहोत त्यांचा दर्जा नक्की काय आहे हा स्वतंत्र वादाचा विषय आहे. हिंदीमध्ये 'दिलवाले दुल्हनिया' नंतर आजतागायत एकही चांगला लव्ह स्टोरी चित्रपट यश राज फ़िल्म्स काढू शकलेले नाहीत. त्याचप्रमाणे 'सत्या' नंतर एकही चांगला अंडरवर्ल्ड बेस्ड चित्रपट रामगोपाल वर्मा काढू शकलेले नाहीत. केवळ आमीर खानच्या 'लगान', 'गझनी' (तोही उचललेलाच) आणि 'थ्री इडियटस' सारख्या चित्रपटांचा अपवाद वगळता एकही उत्कृष्ट असा हिंदी चित्रपट आल्याचं स्मरत नाही. नाही म्हणायला मधल्या काळात 'मानसून वेडिंग', 'कामसूत्र'  सारखे रियालिस्टिक चित्रपट नक्कीच आले. पण तशा चित्रपटांना म्हणावं इतका मोठा प्रेक्षकवर्ग लाभला नाही.

प्रेक्षकांना जे आवडतं तेच विकलं जातं इतकाच बेस पकडून जर चित्रपटांचं वर्गिकरण केलं गेलं तर ते फारसं बरोबर ठरणार नाही. 'मिथुन', 'गोविंदा' यांच्या सुमार चित्रपटांना गर्दी करणारे प्रेक्षक देखील आहेत. म्हणजे ते चित्रपट हिट म्हणायचे का? काही दाक्षिणात्य चित्रपट पाहून तर मला असं वाटलं की मराठीत जर असे चित्रपट निघणार असतील तर ते न निघालेलेच बरे. नागार्जुनाचा 'डॉन न.वन' सारखे चित्रपट बघून हसावं की रडावं हेच कळत नाही. मुळात चित्रपटाचा दर्जा आणि चित्रपट हिट किंवा फ्लॉप असणं ह्या दोन संपूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत.

एखादा चित्रपट रिलीझ होण्यापूर्वी त्याची प्रचंड प्रमाणात जाहिरात करून न्यूज चॅनल वाले भरपूर पैसा कमावतात. त्या जाहिरातबाजीचा एक भाग म्हणून एखाद्या राजकीय पक्षाचा हस्तक्षेप हा देखील तितकाच महत्त्वाचा असतो. एकदा का हा हस्तक्षेप झाला की पुन्हा चर्चा. चर्चेतून वेगवेगळी मते आणि मतांमधून पुन्हा नव्या चर्चा. या प्रोसेसचा कालावधी साधारण महिनाभराचा असतो. महिनाभर चावून चोथा झालेली चर्चा ऐकून कान किटल्यामुळे शेवटी सुजाण अथवा अजाण असा जवळजवळ सगळाच प्रेक्षकवर्ग काय तो पिक्चर एकदा बघून टाकू असं म्हणून थिएटर मध्ये जातो आणि घोडचूक करून बसतो. एकदा असा चित्रपट पाहिल्यावर त्याच्या लक्षात येतं की जाहिरातबाजी करणारे न्यूज चॅनल्स, स्टंट्स करणारे राजकीय पक्ष यापैकी एव्हाना सगळेच थंड झालेले असतात. 'माय नेम इज खान' हे या प्रोसेसचे उत्तम उदाहरण आहे. हल्ली जवळ जवळ प्रत्येक हिंदी चित्रपट, मग त्याचा दर्जा काहीही असो, याच प्रोसेसमुळे हिट झालेला दिसतो. अर्थातच ही सगळी स्टंटबाजी, आऊटडोअर शूटींग्स, न्यूज चॅनल्स वाल्यांना दिला जाणारा पैसा यामुळे बजेट हे वाढणारच.

म्हणूनच बजेट मोठं म्हणजे पिक्चर हिट, ऍक्टर जितका मोठा, वादातीत, उलट सुलट स्टेटमेंटस करणारा, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा असला की पिक्चर हिट हे हल्लिच्या हिंदी फिल्म्सचं हिट होण्यामागचं रहस्य आहे. असे उद्योग करून आणि काहीही करून केवळ प्रेक्षकांना खूष करणं हे एकच लक्ष्य मराठी निर्मात्यांनी ठेवलं तर चित्रपट कदाचित चालतीलही. पण मग दर्जाचं काय, यासाठी वेगळं चर्चासत्र आयोजीत करावं लागेल. जब्बार पटेलांचे जवळ जवळ सर्व मराठी सिनेमे हे अतिशय उच्च दर्जाचे आहेत याबद्दल फारसं दुमत संभवत नाही. उंबरठा, सिंहासन, जैत रे जैत, सामना पासून अगदी बाबासाहेब आंबेडकर, एक होता विदूषक, मुक्ता पर्यंत सगळे सिनेमे दर्जाच्या बाबतीत फारच उजवे आहेत. पण आजच्या भाषेत बोलायचं तर ते हिट, बिग बजेट असे नाहीत. म्हणजेच नुसतेच चालणारे चित्रपट काढणं आणि चांगल्या दर्जाचे चित्रपट चालणं या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. 

वरील बाबी लक्षात घेता नवीन आलेल्या मराठी चित्रपटांपैकी चांगल्या दर्जाच्या चित्रपटांची संख्या हल्लीच्या हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांपेक्षा नक्कीच जास्त आहे. नटरंग, जोगवा, गाभ्रीचा पाऊस, हरिष्चंद्राची फॅक्टरी, रानभूल ही हल्लीची उदाहरणं आहेत. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षात श्वास, वळू, देवराई, शुभमंगल सावधान, वजीर, चौकट राजा अशा अनेक उदाहरणांची दखल घेता येईल. सांगायचा मुद्दा हा की आपल्याला वाटतं तितकी काही मराठी चित्रपटांची आणि साहित्याची दयनीय अवस्था अजून तरी झालेली नाही. मराठी निर्माते जर या खोट्या, फुटकळ आणि अवास्तव प्रसिद्धीच्या मागे लागले तर ते फेमस नक्की होतील पण त्यांचा दर्जा कितपत टिकून राहील हे सांगणं कठीण आहे.