ऑर्गॅनिकला मराठीत सेंद्रीय म्हटले जाते. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रीय शेती. अन्नधान्य पिकवताना त्यावर कोणतीही रासायनिक खते, रसायने यांचा प्रयोग केला जात नाही. शेतीची सर्व प्रक्रियाच रसायनमुक्त असते. म्हणजे जमिनीत रासायनिक खत न वापरता शेणखत, गांडूळखत वापरले जाते. पिकांचे संवर्धन पूर्णपणे नैसर्गिकरीत्या केले जाते. कीटकनाशक रसायनांचा वापर न करता त्याजागी वनस्पतिजन्य द्रावणे (नीम अर्क) किंवा जैविक द्रावणे वापरली जातात. अशा लागवडीतून मिळालेल्या अन्नधान्य, खाद्यपदार्थात विषारी रासायनिक अंश नसतात. अर्थात ही शेती महाग असते त्यामुळे सेंद्रीय पदार्थही महाग असतात. अलिकडे आरोग्याप्रती दक्षता वाढीस लागत आहे म्हणून सेंद्रीय उत्पादनांनाही मागणी वाढत आहे. गायी-म्हशींना रासायनिक इंजेक्शने देऊन अथवा रसायनयुक्त आहार खायला घालण्यापेक्षा नैसर्गिक औषधी व पोषक आहार दिला तर दुधातही विषारी अंश उतरत नाहीत. हे पण सेंद्रीय उत्पादनच.