आणखी एक मुद्दा... मागील प्रतिसादात मी फक्त मराठी विषयावर लिहिले होते. आता तर हद्दच झाली.
महाराष्ट्र टाईम्स मधील बातमीः मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना दरवाजे बंद
मराठी माध्यमातून शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातील बीएड अभ्यासक्रमाचे दार शिक्षण संचालकांनी निर्णयाच्या एका फटकाऱ्याने बंद केले आहे. ऊर्दू, हिंदी, गुजराथी आदी माध्यमांतील विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसणार आहे.
सीईटी उत्तीर्ण झाल्यानंतर पहिल्या प्रवेशफेरीच्या वेळी विद्यार्थ्यांना या नियमाची कल्पना देण्यात आली. इतकेच नव्हे, तर प्रवेशफेरीतूनच बाद ठरवण्यात आल्याने या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले, म्हणून इंग्रजी बीएडसाठी प्रवेशच नाकारण्याचा हा नियम यंदाच अस्तित्वात आल्याचे प्रवेशफेरीच्या वेळी सांगण्यात येत होते. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी बीएड (इंग्रजी) प्रवेशासाठीच्या आवश्यक पात्रता पूर्ण केल्या होत्या. तरीही प्रवेश नाकारल्याने त्यांनी बीएडच्या प्रवेश समितीकडे तक्रार केली. मात्र, बीएडच्या प्रवेश नियमावलीतील 5.2(एच) या नियमाचा दाखला देऊन, दहावीपर्यंतचे शिक्षण अन्यभाषिक माध्यमातून झालेल्या विद्यार्थ्यांना बीएडच्या इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देता येणार नाही, असे उत्तर शिक्षण सहसंचालकांनी दिले.
बीएडसाठी पदवीपर्यंतचे शिक्षण अनिवार्य आहे. दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले असले, तरी कॉलेजशिक्षण इंग्रजीतूनच झालेले असते. कॉलेजच्या पाच वर्षांत इंग्रजीचा बऱ्यापैकी सरावही झालेला असतो. इंग्रजी बीएडसाठी अर्ज केलेल्या एका विद्याथिर्नीने एमएससी केले आहे. सात वषेर् इंग्रजीतून सायन्सचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेली ही विद्याथिर्नी सीईटीच्या गुणवत्तायादीत 39व्या नंबरावर आहे. परंतु केवळ दहावीपर्यंतचे माध्यम मराठी होते, म्हणून तिला इंग्रजी बीएडसाठी प्रवेश नाकारण्यात आला आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा हा जाचक नियम तात्काळ रद्द करण्याची मागणी समतावादी छात्रभारती या विद्याथीर् संघटनेने केली आहे.
जागा शिल्लक राहिल्या, तर इंग्रजी बीएडला प्रवेश देण्याचा विचार करू. बीएड मराठीला प्रवेश घ्यायचा असल्यास तिसऱ्या प्रवेश फेरीला येऊन प्रवेश घ्या, असे या विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी शिक्षण उपसंचालक मुनावर अली उपलब्ध होऊ शकले नाहीत.