देवदत्त, सर्वसाक्षी, मैथिली,

 

आपल्या सगळ्यांचे प्रतिक्रियेबद्द्ल आभार.  मराठीतील मुले गुणवत्ता यादीत झळकतात हे खरे आहे, पण म्हणून १००% मुले हुशारच आहेत असे आपण म्हणता ते जर खरे असते तर मुळात अभ्यासगटच स्थापन करावा लागला नसता.

मंद मुलेच मराठीला जातात हा माझा निष्कर्ष माझ्या आजुबाजूला असलेल्या शाळांच्या  पाहणीतूनच मी काढला आहे.  माझ्या मुलीला शाळेत घालायची वेळ आली तेव्हा मी आजुबाजुच्या शाळांमध्ये चौकशी केली असता,  आधी मराठी शाळाच सापडेनात, (मी नवी मुंबैला राहते),  १० इंग्रजी शाळामध्ये विचारले असता फ़क्त २ च शाळांमध्ये मराठी माध्यम होते (त्यापैकी १ ह्याच वर्षी बंद झाले),  पण १० वीच्या परिक्षेचा निकाल पाहिला असता ४५ च्या वर टक्केवारी नव्हती.  मग मी तिला घाबरुन इंग्रजीलाच घातले,  ती पहिलीत असताना आम्ही जागा बदलुन दुस-या ठिकाणी आलो.  तिथे नविनच मराठि शाळा उघडली होती.  तसे लगेच २ रि पासुन तिला मराठीला घातले.  त्या वर्षी शाळेत मला जवळ जवळ प्रत्येकाने, "अहो, तुमची मुलगी हुशार आहे,  तिला उगाच मराठीला कशाला घातलेत?" असे विचारुन भंडावुन सोडले.  वर्गात सगळी मुले अभ्यासात जरा मागे अशीच होती,  त्यामुळे मुलीला आपण खुपच हुशार असा अहंगंड सुद्धा निर्माण झाला.   तिच्याच वर्गातील एका पालकाने,  आपल्या ढ मुलाला मराठीला घातले आणि धाकटी मुलगी हुशार आहे म्हणुन तिला त्याच शाळेत इंग्रजीला घातले.

बालमोहनला मराठीतुन शिकलेल्या माझ्या एका मैत्रिणीने मुलाला तिथेच इंग्रजीला टाकले.  तिचे म्हणणे - मराठीला चांगला "क्राउड" येत नाही. मग उगाच मुलाला वाइट संगत लागायला नको."

अजुनही अशीच बरीच मते मी ऐकली आहेत.  आणि मला ती ऐकावीच लागतात कारण माझी मुलगी मराठीला जाते.  ज्यांना इंग्रजी जमत नाही त्यानीच मराठीला जावे असाच लोकांनी समज करुन घेतला आहे. 

एकुणच मराठी बद्दल आस्था कमीच आहे.  मी आधीच म्हटल्याप्रमाणे जाणिव पुर्वक जाण्या-यांची संख्या कमी आहे,  असे जाणारे विद्यार्थी हुशार आहेतच.  ते  यादीतही येताहेतही. 

पण अभ्यासगटाचे निष्कर्ष ज्यांना लागू होतात ते सर्वसामान्य विद्यार्थी,  त्यांचे मात्र सगळ्या बाबतीत हाल आहेत.   त्यांची स्वतःची कुवत कमी आहे, पालकांची एकतर क्षमता नाही किंवा उदासिनता आणि अनुत्साहीत शिक्षकवर्ग. इंग्रजीला जाणारी मुलेही अगदी हुशार असतात असे नाही,  उलट मी एकही अक्षर न समजताही, पोपटासारखी अचुक उत्तरे देणारी खुप मुले पाहिली आहेत.

मी खरच मराठी प्रेमी आहे की नाही माहीत नाही पण अभ्यासगटाने आधीच ज्यांना मंद म्हटले आहे (विद्यार्थ्यांना 'प्रथम भाषे'चा पेपर लिहायला वेळ पुरत नाही... त्यातील बऱ्याच प्रश्नांना बगल दिली जाते... कवितांवरच्या प्रश्नांकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे... व्याकरण आणि शुद्धलेखनातील चुकांमध्ये लक्षणीय वाढ वगेरे.. आता ज्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न आहेत त्यांना मंद म्हणायचे नाही?)  त्यांना मीही मंद म्हटले म्हणुन एवढा राग?  मला वाटत नाही की  मुले हुशार आहेत पण फ़क्त चांगले शिक्षक नाही  म्हणुन हा प्रश्न निर्माण झाला आहे.