सदा वक्रः सदा क्रूरः सदा पूजामपेक्षते ।
कन्याराशिस्थितो नित्यं जामाता दशमो ग्रहः ॥

अर्थ-
कन्यारूपी राशीवर कायमचा बसलेला जावई हा दहावा ग्रहच म्हणायचा! तो सदा वाकडा, सदा क्रूर आणि सदा पूजेची अपेक्षा करत असतो.

संदर्भ-
"सुभाषित-मंजूषा", डॉ. विनायक दुर्गे, प्रथमावृत्ती, ऑगस्ट २००७ (विजय प्रकाशन, नागपूर)

अवांतर-
बिरबल आणि बादशहाची गोष्ट
बादशहा राज्यातील तमाम जावयांना सुळी देण्याचा आदेश देतो. सुळांची पाहणी करण्यासाठी बादशहा येतो तेव्हा इतर सामान्य सुळांच्या जोडीला एक चांदीचा आणि एक सोन्याचा सूळ उभारलेला पाहतो. त्या दोन सुळांबद्दल विचारले असता बिरबल म्हणतो "खाविंद, तो चांदीचा सूळ माझ्यासाठी आणि सोन्याचा सूळ आपल्यासाठी आहे. कारण आपण दोघेही कोणा ना कोणाचेतरी जावई आहोत. " हे उत्तर ऐकून बादशहा आपला आदेश मागे घेतो.

तात्पर्य-
सदरहू गोष्टीपुरते मर्यादित - आपल्या जावयाबद्दल (सुनेबद्दल) वाईट बोलण्याआधी आपणही कोणाचेतरी जावई (सून) होतो/आहोत हे ध्यानात ठेवावे. (तसेच आपल्या सासऱ्याबद्दल/सासूबद्दल बोलताना आपणही कोणाचेतरी सासरे/सासू आहोत/होऊ हे ध्यानात ठेवावे. )
सर्वसमावेशक - तुम्हीच सांगा!