श्रीमद्भगवतगीतेच्या दहाव्या अध्यायाला 'विभूतियोग' असे नाव दिले आहे. या अध्यायात भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य विभूतींचे वर्णन केले आहे.

"देवांना आणि महर्षींनाही माझी उत्पत्ती माहीत नाही. मी जन्मरहीत व अनादी आहे. सर्व विश्वाचा उत्पादक मीच आहे. निरंतर माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून माझ्या भजनात रममाण होणाऱ्या नित्यसंतुष्ट अशा परमभक्तांना मी बुद्धियोग म्हणजे सम्यक् ज्ञान देतो. त्यामुळे ते मला येऊन मिळतात. "

विस्तारार्थ भगवान अनेक उदाहरणे देतात. त्यातील काही खालीलप्रमाणे-
मी आदित्यांमध्ये विष्णू आहे, वेदांमध्ये सामवेद, रुद्रांमध्ये शंकर, इंद्रियांमध्ये मन, महर्षींमध्ये भृगुऋषी, यज्ञांमध्ये जपयज्ञ, वृक्षांमध्ये अशत्थवृक्ष, गंधर्वांमध्ये चित्ररथ, सिद्धांमध्ये कपिलमुनी, गजेंद्रांमध्ये ऐरावत, शस्त्रांमध्ये वज्र, गायींमध्ये कामधेनू, सापांमध्ये वासुकी, दैत्यांमध्ये प्रह्लाद, शस्त्रधारींमध्ये राम, विद्यांमध्ये अध्यात्मविद्या, छंदांमध्ये गायत्री, मासांमध्ये मार्गशीर्ष, ऋतूंमध्ये वसंऋतू, पांडवांमध्ये अर्जुन, मुनींमध्ये व्यास आहे.

"अर्जुना, माझ्या विभूतींचा थोडासाच विस्तार तुला सांगितला आहे. माझ्या विभूतींना अंतच नाही. जेथे जेथे ऐश्वर्य आहे, तेज व सामर्थ्य आहे तेथे तेथे माझाच अंश आहे. विशेष गुणांनी युक्त असा तेजस्वी पदार्थ आणि प्राणी माझ्याच अंशाने निर्माण झालेला आहे. इतकेच नव्हे तर मी माझ्या एका लहानशा अंशाने सारे विश्व व्यापून राहिलो आहे असे तू जाण."