हे कोणीच कसे लिहिले नाही?

===

ऑपरेशन रूम समोर २-३ लोक बसलेले असतात. लाल दिवा चालू असतो. मुख्य पात्र येरझाऱ्या घालत असते. एखादी नर्स ट्रे किंवा बाटली घेऊन बाहेर येते. २-३ लोक पटकन उभे राहतात. "येरझाऱ्या" पात्र त्या नर्स जवळ प्रश्नार्थक चेहऱ्याने जाते. कधी नर्स संपूर्ण दुर्लक्ष करून निघून जाते. कधी कधी फक्त मान "नाही" या अर्थाने हालवते. असे १-२-३ वेळा होते. घड्याळाचा क्लोजअप दाखवतात. घड्याळाचे काटे पुढे जातात. लाल दिवा बंद होतो. आणि मग डॉक्टर बाहेर येतात. आणि म्हणतात-

१. "अब इन्हे दवा की नही दुवा की जरूरत है. " इथे "ढँग" हवेच आणि जोडीला व्हायोलिन. मग गोष्टीनुसार एखादे पात्र (हॉस्पिटलामधल्या) देवळात (इथे हमखास पद्मासनस्थ भगवान शंकर असतात. ) जाऊन देवाची कानऊघाडणी करते. किंवा मग हृदय पिळवटून टाकणारे गाणे असते. गाण्यात बासरीचा आणि व्हायोलिनचा पुरेपूर वापर.

२. "हमने पुरी कोशिश की लेकीन बच्चेको नही बचा पाये. (और वो अब कभी माँ नही बन सकती)." इथे "ढँग" हवेच आणि जोडीला व्हायोलीन.

३. "अब खतरा बिलकुल नही है. लेकीन होश आनेमे वक्त लगेगा. " यानंतर साधरणतः सतार किंवा संतूर वर तरल संगीत वाजते. डोळे पुसत पुसत मग कोणीतरी देवाकडे जाऊन (पद्मासनस्थ भगवान शंकर किंवा मुरलीधारी कृष्ण) "भगवान तेरा लाख लाख शुकर" इ. इ.