तुम्ही म्हणता ते सगळं खरं आहे, पण मत्सर हा माणसाच्या स्वभावातला दोष इतक्या सहजा सहजी दूर होणार नाही.

दुसरा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे तर मी माझ्यातलं श्रेष्ठत्व निखारण्या एवजी दुसऱ्याला कसं खाली खेचता येईल, त्याला कसं सतावता येईल हेच बघत राहतो कारण त्याला काही प्रयास पडत नाहीत, हे युगानुयुगे चालू आहे आणि याच स्वभावाचं बहुमत आहे.

तुम्हाला एक प्रसंग सांगतो, मी शाळेत सर्वप्रथम होतो, मला कोणतीही शिकवणी नव्हती, त्या वयात आपल्याला समजत नाही पण  बहुदा शिक्षकांपेक्षा ही माझं आकलन जास्त होतं. आता मला कसा नामोहरम करता येईल? तर आमचे शिकवण्या घेणारे वर्ग शिक्षक आणि ड्रॉइंगचे सर यांनी संगनमत करून मला ड्रॉइंग मधेच नापास केलं! आता ड्रॉइंग हा सबजेक्टिव विषय आहे, खरं तर माझं चित्र उत्तम होतं, पण सत्तेपुढे काय शहाणपण? पन्नास मुलात मी त्रेचाळीसाव्वा आलो. माझी आई माझी घरातली सगळी चित्र घेऊन त्या वर्ग शिक्षकांना भेटायला गेली तर ते आणि ड्रॉइंगचे सर तिला म्हणाले तुम्ही मुख्याध्यापकांकडे जाऊ नका आणि गेलात तर पुढच्या वर्षी आम्हीच आहोत हे लक्षात ठेवा. आता काय करणार? माझे वडील म्हणाले, त्याला शाळेत प्रत्येक वर्षी त्रास होईल, जाऊ दे.  वर्गातली जवळजवळ सगळी मुलं एका बाजूला, त्यांच्या बरोबर शिक्षक आणि मी एकटा अशी परिस्थिती झाली, पण ते अजिबात मनावर न घेता मी अभ्यास करत राहीलो आणि एस एस सी ला  सगळ्या जिल्ह्यात पहिला आलो. मला हे कळायला वेळ लागला की चूक आपली नाही, लोक मत्सरी आहेत.

मी जर उद्विग्न झालो असतो तर मला मार्ग सापडला नसता. मी पुण्याला आलो, पुण्यात तर जे जन्मानी पुणेकर नाहीत त्यांना असं काही तुच्छ लेखतात की तुम्ही पार खचून जाता. माझे बॅचमेटस सगळे पुण्याचे किंवा आमच्या पार्टनरच्या गावचे होते आणि त्यांचा आधीच ग्रुप होता, त्यात सिनीअर्स त्यांनाच सामिल, त्यांनी तर मला ओपन चॅलेंज दिला की तू सी ए होऊनच दाखव! आज परिस्थिती अशी आहे की मला आव्हान देणारे अजून सी ए झाले नाहीत आणि आता या जन्मी तरी होण्याची शक्यता नाही, माझ्या सह्या घ्यायला त्यांना माझ्याकडे यायला लागतं, मी त्यांना मागची काही ओळख दाखवत नाही, आता बोला!

तुम्हाला एकच सांगतो, आपल्याकडे बुद्धीमत्ता आहे, आपण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढू पण उद्विग्न झालो तर आपली बुद्धी आपल्याला साथ देणार नाही आणि मग आपण आपलं सौख्यच गमावून बसू.  प्राप्त परिस्थितीत, अजिबात खचून न जाता मार्ग काढा, शेवटी शक्ती पेक्षा युक्ती केव्हाही श्रेष्ठ आहे.

संजय