मानवी स्वभावाचं आकलन म्हणून करा मग तुम्हाला मार्ग सापडेल. विषय जातीवाचक केलात तर तो कायमचा प्रश्न होईल आणि पीढी-दर-पीढी रेंगाळत राहील. सध्या नेमकं हेच झालंय, पूर्वी समाजाचा एक वर्ग काही कारणानी श्रेष्ठ होता तेव्हा त्यानी दुसऱ्या वर्गावर अन्याय केला, आता ज्यांच्यावर अन्याय झाला ते संघटीत झालेत आणि बदला घेतायंत. पुढे काही कारणांनी परिस्थिती बदलली तर हेच पुन्हा उलट बाजूनी चालू राहील.
तुम्ही फक्त वैयक्तिक पातळीवर बघा आणि अगदी आता, या क्षणी असलेल्या प्रसंगा पुरतं बघा म्हणजे जात मधे न येता (त्याची किंवा तुमची) तुम्हाला त्या प्रसंगात असलेल्या व्यक्तीचं नक्की काय म्हणणं आहे ते कळेल, मग मागचे पुढचे विषय निघणार नाहीत, तुमची बुद्धी एकदम तल्लखतेनं काम करेल. अशा वेळी त्या व्यक्तीला तुम्ही माणूस म्हणून सामोरे जाल आणि प्रसंग एकदम सोपा आणि वस्तुनिष्ठ होईल.
भूतकाळ मधे न आणणं ही तर खरी बुद्धीमत्ता आहे. दुसऱ्यानी जरी तो आणला तरी तुम्ही भूतकाळ मधे न आणता प्रसंग कसा हाताळता हे खरं कौशल्य आहे; आणि मजा म्हणजे हे राष्ट्रीय किंवा सामाजिक पातळीवर नाही तर अगदी कौटुंबिक पातळीवर सुद्धा लागू आहे.
आता रिझर्वेशन वगैरेचं म्हणाल तर एक पर्याय बंद आहे असं समजा आणि त्यापेक्षा श्रेयस दुसरा पर्याय निवडा, विकल्पांचा शोध हा पण बुद्धीचाच एक पैलू नाही का? शेवटी सगळ्या उत्तम आणि कौशल्यपूर्ण कामाला बुद्धीमान माणूसच लागतो, आपल्याला काय अडचण आहे? जिथे असू तिथे आणि जसे असू तसे धमाल करू.
संजय