जगाच्या राजकारणातील वजनदार व्यक्तिमत्त्व ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर आपल्या अरेरावी स्वभावामुळे प्रसिद्ध होते. इराकच्या युद्धात त्यांनी अमेरिकेल साथ दिल्यामुळे सत्तेतील लेबर पक्षाच्या मंत्रीमंडळातील व संसदेतील सदस्यांनी त्यांना याबाबतीत खडसावले आणि सक्तीची निवृत्ती जाहीर करण्यास भाग पाडले. ज्या दिवशी ते पदच्युत झाले, त्या दिवशी ते रेल्वेस्थानकावर सहपरिवार गेले ब साध्या रेलगाडीने इतर प्रवाशांबरोबर रांगेत उभे राहून आपल्या घरी परतले. एकदा ते हिथ्रो विमानतळावर रेल्वेने जात होते, तेव्हा त्यांच्याकडे तिकीटासाठी सुट्टे पैसे नव्हते. सोबत असलेल्या प्रवाशांनी त्यांना तिकीटासाठी थोडे पैसे दिले. त्यामुळेच ते हिथ्रो विमानतळावर पोहोचू शकले.
एका दिशेचा शोध    लेखक-संदीप वासलेकर     राजहंस प्रकाशन, पुणे.
एक माजी पंतप्रधान इतक्या साधेपणाने जीवन जगतो, याचेच आपल्याला आश्चर्य वाटते. पण भारत वगळता अनेक देशांमधील राजकीय पुढारी किती साधेपणाने राहतात, याची अनेक उदाहरणे संदीप वासलेकर यांनी  "एका दिशेचा शोध" या पुस्तकात दिले आहेत. ही उदाहरणे वाचत असताना मनात प्रश्न येतो की आपल्या भारतात हे शक्य आहे का? किंबहुना भारतात या सारखी काही उदाहरणे घडून गेली आहेत. पूर्वोत्तर राज्यातील एका राज्याचा मंत्री १०० रु पगार घेत असे. मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे हे ‘बेस्ट’ने प्रवास करीत असत तर माजी केंद्रीय रेल्वेमंत्री राम नाईक मुंबईत लोकलने प्रवास करीत. ही झाली काही वर्षांपूर्वीची उदाहरणे. अलीकडे मात्र साधा सायकल वापरणारा कार्यकर्ता, नगरसेवक झाल्यानंतर मात्र मोटरसायकल वा मारुती८०० न वापरता थेट स्कोडाच वापरतो. आणि सर्वसामान्यांच्या मनात पण काहीशी अशीच प्रतिमा तयार झाली आहे.
            गळ्यात चार-पाच तोळ्याची चेन असलेला, एका हातात १० तोळ्याचे ब्रेसलेट तर दुसऱ्या हातात स्विस घड्याळ असलेला ‘शोमॅन’ आपल्याला अस्सल नेता वाटतो. हे आपल्या बदलत्या सामाजिक- आर्थिक- मानसिकतेचे चित्रण आहे. वासलेकरांनी दिलेली उदाहरणे म्हणूनच उदबोधक ठरतात.