संघाच्या कार्यावर सुरुवातीपासून ''हिंदुत्ववादी'' असल्याचा आरोप होतो. तसेच भारताच्या कानाकोपऱ्यात संघातर्फे जे कार्य केले जात आहे त्याविषयी, तसेच त्यांच्या विविध समाजकल्याण प्रकल्पांविषयी संघ परिवार व त्याच्याशी संबंधित लोक सोडले तर फार कोणाला माहिती नाही. जी माहिती पुढे येते ती त्रोटक स्वरूपात किंवा साचेबद्ध स्वरूपात. त्यात नाविन्य नाही. वेळोवेळी सत्तारूढ सरकार वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरून जाहिराती देते किंवा दूरदर्शन वा इतर टीव्ही चॅनल्स वर आपापल्या कार्याची तोंड फाटेस्तोवर स्तुती करवून घेते तसेही संघाने केलेले नाही. आजच्या आधुनिक तरुण पिढीपर्यंत वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग माध्यमांतून व तंत्रज्ञानाद्वारा पोचण्यास संघ कमी पडत आहे हे नक्की! जर संघाला खरोखरीच लोकांपर्यंत, सध्याच्या पिढीपर्यंत पोचायचे असेल तर विविध माध्यमांतून संघाचे कार्य व त्याची भूमिका सातत्याने समोर आली पाहिजे. अन्यथा त्यांचे चांगले कार्य समोर न आल्याने असेच गैरसमज पसरत जातील. तसेच प्रतिकारात्मक, आग्रही भूमिका न घेता नेतृत्व करणारी, दिशा देणारी भूमिका संघाला पुढील काळात लोकांच्या अधिक जवळ नेऊ शकेल. संघाचे कार्य जे ''हिंदुत्ववादा''च्या तथाकथित चौकटीत अडकले आहे त्यातूनही आपल्या विचार, कृती व त्यांची योग्य प्रसिद्धी याद्वारे संघाला मार्ग काढावा लागेल. अन्यथा केवळ आपल्या आधीच्या पिढ्यांच्या कर्तृत्वाच्या पुण्याईवर पुढे आलेले आणि प्रसिद्धी माध्यमांबरोबर व आपल्या पब्लिसिटी टीमच्या बरोबर जाणारे राहुल गांधींसारखे युवा नेते देशात व परदेशात संघाबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण करत राहतील.