विकास म्हणजे केवळ आर्थिक संपन्नता, दळणवळणाची आधुनिक माध्यमे, बाजारपेठ, रूंद रस्ते, असे समजले तर आपण स्वत:ची फसवणूक करून घेऊ. माणसाचे आरोग्य, मनस्वास्थ्य, निसर्गाशी त्याचा तोल राखून त्याचा जरूरीपुरता वापर, समाजस्वास्थ्य, माणसाचे परस्परसंबंध, समाजातील विविध धर्मांच्या आणि वंशाच्या लोकांचे ऎक्य, साहित्य, संगीतकला अशा सर्वसमावेशक प्रगतीमुळे मनास मिळणारा उल्हास, अशी विकासाची व्याख्या सर्वत्र रूढ आहे. भारत या गोष्टींमध्ये समृध्द आहे. पण आपण डोळ्यांवर पट्टी बांधून फक्त आर्थिक उत्पन्नाच्या मागे धावत आहोत व तेसुध्दा अल्पशा लोकांच्या फायद्यासाठी. तळागाळातील लोकांचे जीवन सर्वार्थाने सुखी व संपन्न व्हावे हे आपल्याला जेव्हा समजेल तेव्हाच भारतात खरा उष:काल होईल.
संदर्भ- एका दिशेचा शोध, लेखक- संदिप वासलेकर,  प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे

आपल्या समाजाचे अचूक विश्लेषण वासलेकरांनी वरील परिच्छेदातून केले आहे. अलिशान फ्लॅट, गाडी, उंची कपडॅ या हव्यासापोटी माणूस आपल्या मुलांना, मित्रांना, नातेवाईकांना वेळ देऊ शकत नाही.  घरातले एखादे शुभकार्याला हजर राहत नाही. आवडीची गाणी ऐकू शकत नाही. उत्तमोत्तम साहित्य वाचत नाही. इतकेच काय आपल्या प्रकृतीकडेही तो दुर्लक्ष करतो. त्याला हवी असते आर्थिक संपन्नता. हे आहे आजच्या शहरी भागातील माणसाचे जीवन. म्हणूनच वासलेकरांचे वरील विचार योग्य वाटतात.
अधिक माहितीसाठी वाचा-  दुवा क्र. १