सर्वात प्रथम आपल्या शिक्षण पध्दतीत बदल झाला पहिजे. शेतकीशास्त्र, लघुउद्योग, समाजशास्त्र, यांचा योग्यरीत्या अभ्यास व अवलंब झाला पाहिजे. लोकांभिमुख तंत्रज्ञानात संशोधन करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला संगणकशास्त्रज्ञ हवेत पण अमेरिकेतील मोठ्या कंपन्यांचे गुलाम होण्यासाठी नव्हे. भारतील शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडणारे,नवीन तंत्रज्ञानाची ओळख देऊन उत्पादकता वाढवणारे,मालाचे दर एकरी उत्पादन व दर्जा उंचावणारे तज्ञ आपणास हवे आहे. त्यासाठी आपण सक्षम शिक्षणसंस्था उभारु शकतो. भारतात आर्थिक क्षमता आहे. पण डोळे बंद केलेल्यांना ती दृष्टी नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्यापुढील सर्वात मोठे आव्हान आहे ती आपली विचारपध्दती बदलण्याचे.
एका दिशेचा शोध,संदीप वासलेकर,राजहंस प्रकाशन पुणे.
वरील विचार आहेत स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे संस्थापक आणि लेखक संदीप वासलेकर यांच्या एका दिशेचा शोध या पुस्तकातील. बदल हा विचारांतून होतो. आणि विचार निर्माण करण्याचे काम करतात शिक्षण संस्था . कुठल्याही देशाचे स्वास्थ, प्रगती, भवितव्य हे अवलंबुन असते देशातील शैक्षणिक धोरणांवर. ज्या ज्या देशाने शिक्षणाविषयी उदार धोरण राबवलेले आहे आणि राबवत आहेत ते सर्व देश आज आपल्याला प्रगत आणि विकसीत झालेले दिसतील. उदाहरण द्यायची मला तरी गरज वाटत नाही. संशोधनात्मक शिक्षणपध्दतीचा जोवर आपण स्विकार करणार नाही तोवर आपण परावलंबीच असू. कारण  संशोधनात्मक शिक्षणपध्दतीतूनच सकस वैज्ञानिक व तंत्रज्ञ जन्म पावतात. मात्र त्यासाठी गरज आहे ती सक्षम शिक्षणसंस्थंची.
अधिक माहितीसाठी पहा-  दुवा क्र. १