ईमेल नपुंसकलिंगीच ऐकले होते. स्त्रीलिंगी कानाला योग्य वाटत नाही खरे, पण पुल्लिंगी त्याहूनही खटकते. निदान माझ्या कानांना तरी.

अकाउंटबद्दलही काहीसे तसेच. ('माझे खाते' = 'माझे अकाउंट' असे त्याचे स्पष्टीकरण कदाचित  देता येईल. पण 'अकाउंट उघडला' हे, मी वापरत नसलो तरी, का कोण जाणे, पण माझ्या कानांना तितकेसे खटकत नाही. )

मला वाटते हे शब्द मराठीत (कदाचित काही प्रमाणात नव्याने) आयात झालेले असल्याने ज्याच्यात्याच्या लैंगिक पसंतीवर अवलंबून राहावेत. निदान नव्याने आयात झालेल्या, तितक्याशा न रुळलेल्या शब्दांच्या बाबतीत तरी मनाचा तेवढा खुलेपणा दाखवायला हरकत नसावी.

हे रुळलेल्या परभाषीय शब्दांच्या बाबतीत होत नाही, असेही नाही. 'तो ब्रेड' हा पर्याय मोठ्या प्रमाणावर ऐकलेला आहे, मी स्वतः 'तो ब्रेड'च म्हणतो, पण 'ती ब्रेड' हा पाठभेदही भरपूर लोकांच्या तोंडून (विशेषतः चित्पावनांकडून) ऐकलेला आहे.

'तो ट्रक' आणि 'ती ट्रक' हे दोन्ही पर्याय मोठया प्रमाणावर ऐकलेले आहेत.

फार कशाला, 'मजा आली' आणि 'मजा आला' हे दोन्ही पर्याय प्रचलित आहेत.

लैंगिक शिक्षणापेक्षा इतरांच्या लैंगिक पसंतीबद्दल सहिष्णुतेच्या शिक्षणाची (विशेषतः आजच्या युगात) आत्यंतिक निकड भासते, असे नम्रपणे सुचवावेसे वाटते.