पोरी,
तुझे निकालपत्र पाहिले. मी आणि तुझ्या वडिलांनी मिळून तुला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. (मी किंवा तुझ्या वडिलांनी लहानपणी परीक्षेत असले दिवे लावले असते, तर हा असला तुझ्यासारखा जास्तीचा आगाऊपणा न करतासुद्धा माझ्या किंवा ह्यांच्या जमदग्नी आईवडिलांनी आमची घराबाहेर हकालपट्टी केली असती ना, अगदी तस्सेच!) तरी तू आता शुभांगीकडून घरी वगैरे परतणेचे भानगडीत न पडता परस्पर बाहेरच्या बाहेर तोंड काळे करणेचे पाहावे (कायमचे! ), हे उत्तम. (आमचा हुंडा वाचला, असे आम्ही समजू.)
(टीप: 'तोंड काळे करणे' म्हणजे 'खचकणे' किंवा 'कटणे'. राकेशचे आडनाव 'काळे' असल्यास ते जमेस धरले जाणार नाही. )
तुझी,
आई.
ता. क.: हेही तितकेच खोटे आहे, पण निकालपत्र पाहून आईने रागे भरणे याहूनही अधिक भयंकर काही असू शकते याची तुला जाणीव व्हावी (आणि भविष्यात असला आचरट आगाऊपणा या घरात खपवून घेतला जाणार नाही हेही तुला कायमचे उमजावे), म्हणून हा पत्रप्रपंच.