गांधींचं तत्त्वज्ञान फक्त गांधींसाठीच योग्य आहे.
खरे आहे. गांधी (किंवा येशू, किंवा मुहम्मद, किंवा गौतम, किंवा आणखी कोणीही, फार कशाला, बव्हंशी तुम्ही किंवा मीसुद्धा! ) स्वतःला वेळोवेळी जे काही पटत गेले (जाते), त्याप्रमाणे वागत गेले (जातो). त्याबद्दल प्रत्येक गोष्टीचे मला किंवा सर्वसाक्षींना किंवा अन्य कोणाला वेळोवेळी स्पष्टीकरण देण्याची त्यांना (किंवा तुम्हाला किंवा मला) फारशी गरज* वाटली (वाटत) नाही - नसावी! कारण वेळोवेळी जे काही योग्य वाटत गेले, त्याप्रमाणे वागण्याची, आणि काल जे योग्य वाटले आणि आज जे योग्य वाटते याच्यात तफावत निघाल्यास तुम्हाला, मला किंवा सर्वसाक्षींना त्याबद्दल स्पष्टीकरण न देता आपली वागणूक बदलण्याची त्यांना मुभा होती - आपणा सर्वांनाच तशी मुभा आहे.
त्यापुढे, एखादी व्यक्ती ही गांधींची अनुयायी आहे म्हटल्यावर प्रत्येक प्रसंगी ('व्हॉट वुड जीझस डू'च्या धर्तीवर) 'या प्रसंगी गांधी असते तर त्यांनी काय केले असते' असा प्रश्न स्वतःला विचारून त्याप्रमाणे आणि त्याप्रमाणेच कृती करणे हे त्या व्यक्तीवर बंधनकारक आहे, असे वाटत नाही. गांधींच्या विचारांचा अशा व्यक्तीवर प्रभाव असू शकेल, गांधींची एकंदर विचारसरणी (जिच्या अढळतेची शंभर टक्के हमी खुद्द गांधी देऊ शकले असते असे वाटत नाही - किंबहुना विचार करू शकणाऱ्या कोठल्याच व्यक्तीच्या विचारांच्या अढळतेची हमी** कोणीही देऊ शकेल असे वाटत नाही, अगदी ती व्यक्तीसुद्धा!) अशा व्यक्तीसाठी मार्गदर्शक तत्त्व म्हणून उपयुक्त असेल, पण म्हणून प्रत्येक प्रसंगी त्याचे वागणे, त्याचे विचार हे गांधींच्या विचारांशी मिळतेजुळते असलेच पाहिजेत, असे काहीही नाही. प्रसंगी अशा व्यक्तीचे विचार पूर्णपणे वेगळे, गांधींच्या विचारांशी पूर्णपणे फारकत घेणारे असू शकतात. अशी व्यक्ती गांधीवादी असेलही, पण गांधी नाही - गांधी असण्याची अपेक्षा गांधींव्यतिरिक्त इतर कोणाकडूनही करता येणार नाही - करणे फोल आहे. (उलटपक्षी गांधींकडून गांधी असण्याची अपेक्षा करताना 'गांधी (असणे) म्हणजे काय' याची जशी योग्य वाटेल तशी व्याख्या करण्याचे - आणि ती वेळोवेळी यथामति बदलत राहण्याचे - सर्वाधिकार फक्त गांधींकडे राखीव आहेत, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. )
'शेवटचा (एकमेव? ) ख्रिस्ती क्रूसावर मेला', असे म्हणतात. गांधीवादाबद्दल याहून वेगळी अपेक्षा का करावी? (आणि तसेही 'गांधीवाद' हा शब्द खुद्द गांधींना मान्य नसल्याचे, आपला कोणताही 'वाद' किंवा 'इझम' नाही असे गांधींचे म्हणणे असल्याचे त्यांच्या स्वतःच्याच लिखाणात कोठेतरी वाचल्याचे स्मरते.)
कोणीही दुसऱ्याचं तत्त्वज्ञान व दुसऱ्याचा धर्म आंधळेपणानी उचलू नये.
हेही खरेच. पण याहीपेक्षा 'कोणीही दुसऱ्याचे तत्त्वज्ञान आणि दुसऱ्याचा धर्म आंधळेपणाने उचलत नाही' असे म्हणणे अधिक सयुक्तिक वाटते. (चूभूद्याघ्या. )
बाकी पराभवाचेच म्हणायचे, तर नेहमी गांधींच्या विचाराप्रमाणे तंतोतंत वागणे हे गांधींचे अनुयायी म्हणवणाऱ्यांवर - गांधी'वाद्यां'वर - सदासर्वकाळ बंधनकारक नाही असे एकदा म्हटल्यावर, गांधींचे अनुयायी म्हणवणारे एखाद्या (किंवा अनेक) प्रसंगी गांधींच्या ज्ञात विचारांशी पूर्ण फारकत घेऊन जरी वागले, तरी त्यातून गांधींच्या विचारांचा पराभव होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. (गांधींनी कोणाला सक्तीने आपले अनुयायी बनवल्याचे ज्ञात नाही. आणि स्वेच्छेने बनलेल्या अनुयायांना भिन्न मार्ग चोखाळण्याचा अधिकार निर्विवाद आहे. तसेही आपल्याला अनुयायी असावेतच, इतरांनी काहीही करून आपले अनुयायित्व पत्करावेच, असाही गांधींचा आग्रह असल्याचे ज्ञात नाही.) पराभवाचा प्रश्न जर गांधी स्वतः या प्रसंगी स्वतःच्याच विचारांविरूद्ध वागले असते तर कदाचित येऊ शकलाही असता, परंतु या प्रसंगी ते हयात नसल्याने तोही प्रश्न उद्भवत नाही. आणि वेळोवेळी प्रसंगानुरूप आपले विचार शोधित करण्याचा, बदलण्याचा (थोडक्यात 'गांधीवाद' किंवा 'गांधींचे विचार' याची व्याख्या बदलण्याचा) त्यांचा - किंवा विचार करू शकणाऱ्या कोणत्याही माणसाचा - अधिकार लक्षात घेता, त्याही प्रसंगी (हा आत्याबाईच्या हॉर्मोनल इंबॅलन्सचा प्रश्न असला तरी) 'त्यांच्या विचारांच्या पराभवा'चा मुद्दा रद्दबातल ठरतो. (असा विचार बदलण्यामागे काही ठोस कारणमीमांसा असावी, हे मान्य. पण अशा ठोस कारणमीमांसेचे काही स्पष्टीकरणही मला किंवा सर्वसाक्षींना व्यक्तिशः देणे हे गांधींवर बंधनकारक नसावे. अनेकदा ते स्वेच्छेने आपले विचार ठिकठिकाणी आपल्या लिखाणातून मांडत, हा भाग अलाहिदा. )
तळटीपा:
* 'मी जगास स्पष्टीकरण देणे लागत नाही', अर्थात 'आय डोण्ट ओव द वर्ल्ड ऍन एक्स्प्लनेशन' हे टग्यावादाचे मूलभूत तत्त्व गांधींना मान्य होते, असे दिसते, आणि त्या प्रमाणात गांधी हे टग्यावादी होते, असे म्हणता येईल. (नव्हे होतेच! ) पण म्हणून गांधींनी प्रत्येक गोष्ट टग्याच्या विचारांप्रमाणेच केली पाहिजे, अशी अपेक्षा करता येणार नाही***. खुद्द टग्याची तशी अपेक्षा नाही.
** 'विचारसातत्य हा गाढवाचा सद्गुण आहे' अशा अर्थाचे एक इंग्रजी सुभाषित ('कन्सिस्टन्सी इझ द व्हर्च्यू ऑफ ऍन ऍस') सर्वश्रुत आहेच.
*** 'जगातील सर्व असंतोषाचे मूळ भुकेत आहे. आता ही हिंदुस्थानातलीच गडबड पाहा - गांधी (उपोषण वगैरे करून भुकेले राहण्याऐवजी) एखादा रसरशीत ष्टेक समोर घेऊन जर हादडायला बसले, तर हा सविनय कायदेभंग वगैरे फालतूपणा आपोआप नाहीसा होईल' असे वुडहाउसच्या एका पात्राचे (मि. मलिनर) म्हणणे या निमित्ताने आठवते. आता गांधी हे टग्यावादी असले, आणि टग्याला भलेही ष्टेक म्हणजे जीव की प्राण असला, तरी म्हणून गांधींनी आपली शाकाहारी विचारसरणी सोडावी आणि गोमांसभक्षण सुरू करावे, असा टग्याचा मुळीच आग्रह नाही. शेवटी गांधी गांधी आहेत आणि टग्या टग्या आहे - बरीचशी मते पटली म्हणून काय झाले? (आणि हो, टग्याला चियांती - उच्चारी कियांती? - , पीनो नोआ(र) आणि कधीमधी कॅबर्ने सॉविन्योंसुद्धा आवडते. )
(संपादित : प्रशासक)