आपण पैसा जास्त मिळणार म्हटल्यावर कामाचं स्वरूप काय आहे, आपल्याला ते करताना मजा येईल का, मिळालेला पैसा उपभोगता येईल का म्हणजे तो उपभोगायला सवड राहील का असा सर्वांगीण विचार करत नाही त्यामुळे दोन गोष्टी होतात : एक, पैसा जीवाची प्रचंड ओढाताण करतो आणि दोन, तो उपभोगता येत नाही.

भारतातल्या सर्व तरुण पिढीनं असं ठरवलं की इतका पैसा आहे ना मग अर्धवेळच काम करू आणि बाकीचा वेळ स्वतःचा इतर क्षेत्रात विकास आणि उपभोग यासाठी वापरू तर अनेक फायदे आहेत :

एक : सर्वांना काम मिळेल (इक्वल डिस्ट्रिब्यूशन ऑफ अपॉरच्युनिटी अँड वेल्थ) आणि कामाचा अजिबात ताण येणार नाही. यामुळे सृजनात्मकता देखील वाढेल. 

दोन : महागाई पूर्णपणे नियंत्रणात राहील कारण सध्या वस्तूची कॉस्ट काय आहे या पेक्षा लोक किती अफोर्ड करू शकतात असा दृष्टिकोन झाला आहे, म्हणजे फ्लॅटची कॉस्ट दहा लाखच आहे पण इएमाय पस्तीस हजार परवडतो म्हटल्यावर ती चाळीस लाख झाली आहे. डोसा दहा किंवा पंधराचाच आहे पण तुम्हाला तो हवाच आहे म्हणून पन्नास रुपये झाला आहे. तुम्ही पिक्चर अडीचशेचं तिकीट काढून बघणार म्हटल्यावर नट-नट्यांनी कोट्यवधी रुपये मागायला सुरुवात केली आहे. गरज नसताना वाट्टेल त्या कार्स बाजारात येतायत.

तीन : कामाचा ओघ सतत राहू शकेल कारण ते झेपण्याची संपूर्ण देशाचीच क्षमता उंचावलेली असेल.

चार : काम करणाऱ्याचं म्हणजे भारताच्या आजच्या तरुण पिढीचं आरोग्य चांगलं राहील! ही पिढी आरोग्यपूर्ण तर पुढची पिढी आरोग्यपूर्ण!

बघा कसं जमतंय ते

संजय