माझा एक स्वभाव आहे की प्रश्न पडला की लगेच सोडवायचा! अगदी आपल्या हाताबाहेरचे प्रसंग सोडता झोपण्यापूर्वी मी सगळं संपवलेलं असतं आणि प्रश्न लगेच सुटणारा नसेल तरी तो सोडवायला आज सुरूवात झालेली असते. मला प्रश्न घेऊन जगता येत नाही.

तुम्हाला पटत असेल तर बघा मी स्वतःला पैशापेक्षा नेहमी मोठा मानतो त्यामुळे पैसा मला कधीही ओढ लावत नाही.

मी जेव्हा नोकरी करत होतो (पार्ट टाईम) तेव्हा मला एका क्षणी वाटलं की पैसा मिळत नसता तर आपण उगीच इतकं लवकर ऊठलो असतो का? इतकी धावपळ करत ट्रेन पकडली असती का? मनात नसताना मिटींगज् अटेंड केल्या असत्या का? माझा बॉस माझा इतका मित्र आहे की मला कंटाळा आला तर मी त्याच्याकडेच रहायचो. मी पुढच्या आठवड्यात त्याला अनडेटेड राजीनामा दिला म्हटलं इथून पुढे तुला योग्य प्रोफेसर मिळेपर्यंत मी  शिकवीन मला आज पासून पगार नको. आता माझं क्वालिफिकेशन वगैरे मुद्दे सोडा पण एडेड कॉलेजची कन्फर्मड नोकरी ती ही पार्ट टाइम! मी हा सोर्स गेला तर गॅप कशी भरणार वगैरे विचार केला नाही आणि मी एकदम कुटुंब वत्सल माणूस आहे!

असो, मागे एकदा असंच एकानी निराशेवर लिहिलं होतं मी त्यांना मजेत कसं जगता येईल याचे वेगवेगळे उपाय सांगीतले तर त्यांना वाटलं मी त्यांच्या निराशेचा अपमान केलायं! मला वाटतं प्रश्न मांडून जर उत्तर नको असेल नुसती सहानुभूती हवी असेल, तर ती मिळेल पण ती निरुपयोगी आहे, आयुष्य तसंच राहील.

शेखर एक अत्यंत व्यक्तिगत गोष्ट सांगतो : ओशो म्हणाले होते मजेत जगायला दिवसातले चार तास काम पुरेसं आहे. मी त्याही पेक्षा किती तरी कमी काम करतो, आवडेल त्याच लोकांचं, अत्यंत योग्य मोबदल्यात आणि मला वाटेल तेव्हा काम करतो तरी सगळी कामं व्यवस्थित संपवलेली असतात आणि मजा म्हणजे आजपर्यंत मला पैसा कधीही कमी पडला नाही आणि आता तर इतका वर्तमानात असतो की या जन्मात पैसा कधीही कमी पडणार नाही. पैसा कमी पडायला भविष्यकाळ वर्तमानात  आणायला लागतो आणि मी मनाच्या त्या भुलाव्यातून केव्हाच बाहेर पडलोय !

आणखी एक सांगावसं वाटतं जीवनाचा दर्जा निश्चीत उंचावतो पण तुम्ही जर वर्तमानात जगायची कला आत्मसात केली नाही तर कितीही पैसा असला तरी पैसा कमी पडेल ही भीती कायम रहाते. माझ्या अनेक मित्रांनी आणि क्लायंटस् नि पुढची पीढी मजेत राहील इतका पैसा जमवला आहे पण अजून तेच आयुष्य त्याच पद्धतीनं जगतायंत. याचं  कारण मजेशीर आहे, पैसा आणि भविष्यकाळ या दोन्ही मनाच्या कल्पनात तुम्ही स्वतःला विसरलेले असता आणि हे विस्मरणच मनाला बेलगाम करतं आणि आपण पुन्हा सचिंत होतो!

संजय