मुंबई, २० नोव्हेंबर/ प्रतिनिधी गेली
काही वर्षे दिल्लीतील राजकारणात रूळल्यामुळे आपल्या मराठी प्रेमाविषयी
शंका घेणाऱ्यांना यापुढे ‘केवळ मराठीच..’ असे ठणकावून सांगत मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मातृभाषा प्रेमाची चुणूक दाखविली! ‘मराठी
भाषा विभाग’ हे नवे खाते आपल्याकडे घेणाऱ्या मुख्यमंत्र्यानी यापुढे
पत्रकार परिषदेतही मराठीतूनच उत्तरे मिळतील असे सांगून राज्याचा कारभार
यापुढे खऱ्या अर्थाने मराठीभिमुख होईल असे संकेत दिले.
बराच काळ दिल्लीत घालविलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदी निवड
झाल्यानंतर मुंबईचा ‘बंबई’ असा उल्लेख केल्याने त्यांच्यावर टीका झाली
होती. राज्यातील शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी चव्हाण
यांच्या मातृभाषा प्रेमाबद्दल शंका उपस्थित करून त्यांच्यावर जोरदार
टीकास्त्र सोडले होते. मनेसेने अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर चव्हाण यांना
मराठीसाठी माळ देण्याची घोषणा करून त्यांची खिल्ली उडविली होती. तसेच
चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ मराठीतूनच घ्यावी अशी मागणीही केली
होती. या पाश्र्वभूमिवर मंत्रिमंडळ विस्तारात गेले आठवडाभर अडकलेल्या
मुख्यमंत्र्यांनी आज खऱ्या अर्थाने आपल्या कामकाजाला सुरूवात केली. आणि
प्रारंभीच मराठीचा जयजयकार करून आपल्या विरोधकांना विशेषत: मनसेला चांगलीच
धोबीपछाड दिली. आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत
पत्रकाराच्या विविध भाषिक प्रश्नांना केवळ मराठीतच उत्तरे देणाऱ्या
मुख्यमंत्र्यानी चॅनेलनाही ‘यापुढे केवळ मराठीतच..’ असे ठणकावून सांगत
हिंदी आणि इंग्रजीत बोलण्यास नकार देत आपला मराठी बाणा दाखवून दिला.
चॅनेलच्या प्रतिनिधीनी चव्हाण यांना वारंवार हिंदीत बोलण्याची विनंती केली.
मात्र त्यानी ती फेटाळून लावत केवळ मराठीतच बोलणार असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे नव्यानेच निर्माण झालेले ‘मराठी भाषा विभाग’ हे खातेही
मुख्यमंत्र्यानी आपल्याकडेच घेतले आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून मराठीचा मुद्दा मनसे आणि
सेनेकडून हिरावून घेण्यासाठी तर चव्हाण यांचा हा मराठी बाणा नाही ना, अशी
शंकाही घेतली जात आहे. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार
परिषदेची परंपरा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मात्र
त्यात केवळ मंत्रिमंडळ निर्णयाबाबतच प्रश्नोत्तरे होतील. त्याबाहेरील
प्रश्नांवर चर्चा होणार नाही असे प्रारंभीच स्पष्ट करून पत्रकार परिषदेचा
‘दिल्ली पॅटर्न’ राज्यातही लागू करण्याचे संकेत चव्हाण यांनी दिले.