आषाढ शुद्ध एकादशीला क्षीरसागरात झोपी गेलेले श्रीविष्णू कार्तिक शुद्ध एकादशीला जागे होतात आणि चातुर्मास संपतो. म्हणून हा कार्तिक महिना विशेष महत्त्वाचा. या महिन्यात श्रीराम, श्रीकृष्ण, विठ्ठल, शिवशंभू या देवांच्या विविध प्रकारे उपासना करतात. तुळशीचं लग्न, दीपोत्सव, वैकुण्ठ चतुर्दशी (शैव-वैष्ण्वांनी परस्परांच्या दैवतांना प्रणिपात करण्याचा दिवस), त्रिपुरारी पौर्णिमा हे दिवस कार्तिकात साजरे होतात. कार्तिक स्नानाचेही महत्त्व आहे. साधना करणाऱ्या साधकांसाठीही हा महिना उपासनेचे विशेष फळ देणारा आहे.

काकड्याचे अनुभव लहानपणी कधीच घेतले नसले, तरी सुदैवाने गेल्या वर्षभरात काकड्याला हजर राहण्याचे काही प्रसंग आले. त्यापैकी श्री क्षेत्र गोंदवले येथे अक्षय तृतियेच्या दिवशी लाभलेली काकडआरती अजूनही मनात ताजी आहे, या लेखामुळे ती पुन्हा अनुभवता आली. काकडा भल्या पहाटे केला जात असल्यामुळे वातावरणातली प्रसन्न शांतता, सौम्य आवाजात म्हटली जाणारी पदं, हलकेच वाजणारी घंटा, देवाच्या चेहऱ्यावर पडलेला ज्योतींचा प्रकाश, उदबत्त्यांचा गंध, असा हा पंचेंद्रियांना तृप्त करणारा अनुभव ठरतो. भक्तीभाव व्यक्त करणारे घरगुती शब्द लहान बाळाला जागं करताना आईच्या स्वरात आपसूकच येणाऱ्या मायेने म्हटले जातात. आपल्या डोळ्यांदेखत आपला देव जागा होतो आहे, ही भावना मनात उमटते. एवढ्या पहाटे, कार्तिकातल्या गारव्यात होणाऱ्या काकड्याला बहुधा निव्वळ उपचारादाखल येणारे भाविक नसतात. ज्यांना याची खरोखरीच गोडी असेल, अशी मोजकीच मंडळी मात्र काकड्याला आवर्जून हजर राहतात.

काकडआरती प्रमाणेच शेजारतीबद्दलही असेच रसाळ अनुभव वाचायला आवडेल.

पु. ले. शु.

श्रीराम.