कथा वाचता वाचता उत्सुकता वाढवते आणि काळजाला भिडते.
वाचताना अनेक न लिहिलेल्या गोष्टी जाणवतात आणि त्यातच कथेचं यश सामावलेलं आहे. रवीला विमानतळावरून थेट आपल्या घरी नेण्यात सिंधूताईंचा पुन्हा अपमान करायचा माईंचा हेतू दिसून येतो. सिंधूताईंना माईंकडून झालेल्या स्वतःच्या अपमानाचं, मानहानीचं दु:ख आहे त्याचबरोबर रवीच्या अजाणत्या वयात माईंकडून त्याची झालेली उपेक्षा व दुर्लक्ष याचंही दुःख आहे. कदाचित त्यामुळेच सिंधूताईंना भूतकाळ विसरता येत नाही. पण रवीचं तसं नाही. अजाणत्या वयात काहीही झालं असलं तरी जाणत्या वयातल्या यशामुळे ते विसरणं त्याला शक्य आहे. त्यामुळे सिंधूताईंबद्दल सहानुभूती वाटूनही "आपणही झालं गेलं विसरून जाऊ या" म्हणत नकारात्मक भूतकाळाचं ओझं फेकून देणाऱ्या रवीलाही चूक म्हणवत नाही. या ठिकाणी कथा अनपेक्षित वळण घेते नि चटका लावून जाते.