हा त्रिपुरारी कोण? बहुधा शंकर. शंकराच्या मदतीने देवांनी त्रिपुर नावाच्या असुराचा ज्या दिवशी  वध केला त्या दिवसाला, म्हणजे कार्तिक पौर्णिमेला,  त्रिपुरी पौर्णिमा म्हणावयाला पाहिजे आणि तसे म्हणतातही! कॅलेंडरवर आणि पंचांगात मात्र त्रिपुरारी  लिहिले असते. या त्रिपुराने आपल्या नगरीभोवती तीन अजस्र तट (त्रिपुर) उभे केले होते आणि म्हणून तो अजिंक्य झाला होता.

आषाढ शुद्ध एकादशीला झोपी गेलेले विष्णू चार महिन्यांनी कार्तिक शुद्ध एकादशीला जागे होतात, आणि चतुर्मास संपतो(चातुर्मास्य समाप्ती).  या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न करता येते, आणि खऱ्या अर्थाने लग्नांचा मौसम सुरू होतो. चतुर्मासात लग्ने न करण्याची प्रथा आहे. (चतुर्मासाला बहुतेक सर्व जण चातुर्मास म्हणतात.)

ज्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र कृत्तिका नक्षत्रात असतो त्या महिन्याला कार्तिक म्हणतात. 

कार्तिक शुद्ध प्रतिपदा : गोवर्धन प्रतिपदा(या दिवशी कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून धरला), बलि‌ प्रतिपदा, दिवाळीतला पाडवा, विक्रम संवत नावाच्या वर्षगणनेचा पहिला दिवस. याशिवाय कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात पांडव पंचमी, कांदे नवमी(या दिवशी आणि या दिवसापासून पुढे आठ महिने कांदे, लसूण आणि वांगी  खायला परवानगी असते!), प्रबोधिनी एकादशी वगैरे महत्त्वाच्या तिथ्या येतात.