नीट पहाल तर आयुष्य हाच एक रिकामा वेळ आहे. आणि जो तो आपल्या परीने हा रिकामा वेळ भरून काढत आहे.
कोणत्याही परी न वापरता वेळ जातच असतो. माझे एक मित्र त्याना "तुम्ही वेळ कसा घालवता ? "असे विचारल्यावर उत्तर देतात
"वेळ घालवण्यासाठी मला काहीच करावे लागत नाही. तो जातच असतो. गीतेच्या १८ व्या अध्यायात म्हटले आहे
न हि देहभ्रुता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः ।
यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते ॥१८.११॥
म्हणजे
कर्मत्याग नसे पूर्ण शक्य जो देहधारि त्या ।
तयासी म्हणती त्यागी सोडी कर्मफलास जो ॥
त्यामुळे जो अवलिया तटस्थपणे रिक्ततेला न्याहाळतो म्हणजे काय करतो ? की काहीच करत नाही ? मग तो जगला काय आणि गेला काय , काय फरक पडतो ?
   आपण ज्या काही कृती करत असतो त्या काही केवळ चला आयुष्याचा रिकामा वेळ भरून काढूया अशा भावनेने करतो असे काही दिसत नाही़
उलट काहीतरी अर्थपूर्ण कृती घडावी अशीच इच्छा धरून करतो. ज्याच्या हातून अशी अर्थपूर्ण कृती उत्कृष्टपणे होते त्यांचे जीवन सफल झाले असे समजतो अशी निदान माझी तरी समजूत आहे.