कर्माची महती:
शीघ्र पावती जिथे सांख्य ते ज्ञान योग आचरूनी। तिथे चि जाती यथाक्रम तसे योगी कर्मे करूनी (३.५)
जशी जयाची असे पात्रता तसा मार्ग संबंध। मत्प्राप्ती-पथी नसे सर्वथा प्रमुख गौण हा भेद (३.६)
जाण निश्चये जया साधका नैष्कर्म्य-पदी आस्था। तये सर्वथा ह्या कर्म-पथा न च सांडावे पार्था (३.९)
क्षण हि न कोणी कर्मावाचुनी जगी रिकामा राहे। प्रकृति-गुण तया अवश करुनिया कर्म करविती पाहे (३.१०)
केवळ कर्मेंद्रिये रोधुनी मनात चिंती भोग। मिथ्याचारी मूढात्मा तो तया न कळला योग (३.१७)
नियत कर्म तू करी कर्म ते थोर अकर्माहून। देह-धारणा तीही घडे ना तुज कर्मावाचून (३.१९)
स्वकर्म-सेवा हा नित्य नव महायज्ञ जाणावा। नसे वानवा हा चि मानवा मोक्ष-सुखाचा ठेवा (३.२२)
ऐक अर्जुना, मूर्ती ह्या जगी लाहुनी नर देहाची। ते मूढमती जे नर खंती बाळगिती कर्माची (३.४५)
सामान्यजन कसे असतात आणि ज्ञान्याची भूमिका कशी असावी:
की कर्म-बळे सिद्धी पावले जनकादिक ते पाही। लोक-संग्रही दृष्टी ठेवुनी करी कर्म ते तू ही (३.५२)
डोळस जेवी मार्ग दाखवी अंधा हाती धरूनी। प्रकट करावा अज्ञ-बांधवा तेवी धर्म आचरूनी (३.५३)
श्रेष्ठ आचरे ते चि अनुसरे जन हि सकळ सामान्य। प्रमाण मानी जे तो ते ते तया होतसे मान्य (३.५४)
खरा ज्ञानी शून्यात भेलकांडत नाही, अलौकिक आहोत अशा थाटात वावरत नाही, नि:संगपणे सामान्यजनातलाच एक होऊन सत्कर्माचे आदर्श उभे करतो:
मूढ गुंतुनी करिती कर्मे तशी चि ती ज्ञात्याने। लोक-संग्रहा इच्छुनी इथे नि:संगपणे करणे (३.५८)
कर्मे करूनी जना वळवुनी सत्पथासी लावावे। लौकिकात ह्या न च धनंजया, तये अलौकिक व्हावे (३.५९)
कर्मी जडले तरी तयांचा बुद्धि-भेद न करावा। सत्कर्माचा मार्ग तयाना आचरूनी दावावा (३.६३)