मला माईंड मॅपिंगचे पारंपारिक अध्ययनपद्धतींत नसलेले खालील फायदे दिसले.
१. एका कागदावर आपण जास्त व्यापक किंवा विस्तीर्ण माहिती नोंदवू शकतो.
२. महत्त्वाच्या दृष्टीने मुख्य मुद्दे, उपमुद्दे, अशी पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या इ. क्रमांकाची वर्गवार प्रतवारीची उतरंड प्रत्यक्ष दिसते.
३. प्रतिमा वापरल्यामुळें शब्दसंख्या कमी होते. मुद्दा मनावर खोल ठसतो व दीर्घ काळ स्मरणांत राहातो.
४. शतिमा (शब्द + प्रतिमा, Word + Image = Wimage), वापरल्यामुळें मुद्दा मनावर खोल ठसतो व दीर्घ काळ स्मरणात राहातो.
५. प्रतिमा, शतिमा, कळीचे शब्द - key-words आणि लघुरूपे - abbreviations - वापरल्यामुळें जो मुद्दा शब्दात मांडता येत नाही तोही आकृतीच्या वा प्रतिमेच्या साहाय्यानें मांडता येतो त्यामुळे अमूर्त संकल्पना व त्या संकल्पनेची रचना समजणें सोपे जाते.
६. विविध रंग वापरल्यामुळें रचना सुगम होते; त्याबरोबरच सारख्या वाटणार्‍या दोन संकल्पनातील व मुद्द्यांतला फरक स्पष्ट होतो. त्यामुळे संदिग्धता टळते, सरमिसळ होत नाहीं आणि मनातला गोंधळ दूर होतो.
७. प्रतिमा, शतिमा, रंगांचा वापर, वृक्षरूप वा चाकाच्या अरीसारखा मध्यवर्ती गोलकेंद्रापासून दूर जाणारा - Radial - आकृतीबंध, विविध रंगांचा वापर यामुळें क्लिष्ट विषय सोपा होतो, विषयाचे भय कमी होते आणि मांडणी आकर्षक होते.
८. शब्दसंख्या कमी झाल्यामुळें वेळ वाचतो आणि टिपणें त्वरित काढतां येतात, कमी वेळांत जास्त अभ्यास.
९. आकर्षक मांडणी, चित्रे, प्रतिमा, शतिमा यांच्या वापरामुळें विषय जास्त सोपेपणाने आणि नेमकेपणानें मांडला जातो आणि विषयाची गोडी निर्माण होते.
१०. विषयाची गोडी लागल्यामुळें आत्मविश्वास वाढतो. ‘इमोशनल इंटलिजन्स’कार डॅनिअल गोलमन म्हणतात त्याप्रमाणें आत्मविश्वास आणि प्रसन्न मनस्थितीमुळे प्रत्येकाची बौद्धिक तसेंच शारीरिक कार्यक्षमता वाढते.
११. आत्मविश्वास वाढल्यामुळे सर्वंकष अध्ययनप्रक्रिया सुधारते.
१२. शब्दांबरोबरच प्रतिमा, आकृत्या, कळीचे शब्द, लघुरूपे, शतिमा, विविध रंग इ. चा वापर तसेंच उमलता आत्मविश्वास यामुळें नैसर्गिक वा उपजत प्रतिभेला वाव मिळतो व नवनवीन संकल्पना सुचत जातात, एका प्रश्नाला अनेक प्रकारें समस्या शोधता येतात त्यामुळें खास करून व्यवस्थापन तसेंच प्रशासनात निर्णयाच्या निवडीला जास्त पर्याय उपलब्ध होतात.

व्यवहारांतील उपयोग:
१. शालेय, महाविद्यालयीन, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणार्‍यांना टिपणे काढायला पारंपारिक पद्धतीपेक्षा कमी वेळ, कमी कागद, जास्त नेमकेपणा असलेली, समजायला जास्त सोपी अशी पद्धत मिळते.
२. कमी जागेत जास्त मजकूर राहात असल्यामुळे मानसिकदृष्ट्या अभ्यास फारसा नाहीं असे वाटते व परीक्षा जवळ आल्यावर कमी वेळेचा ताण येत नाही.
३. केलेल्या अभ्यासातील अत्यावश्यक असे बारीकसारीक तपशील परीक्षेंत विसरण्याची शक्यता या पद्धतींत फारच कमी होते.
४. सर्जनशीलतेला जास्त वाव मिळाल्यामुळे शालेय, महाविद्यालयीन प्रकल्पांत तसेच संशोधनक्षेत्रात कामगिरी जास्त प्रभावी होते.
५. माईंड मॅप टिपणे हाताशी असल्यावर प्रेझेंटेशन सोपे होते आणि जास्त प्रभावीपणे करता येते.
६. व्यवस्थापनात समस्यानिवारण निवडीला जास्त पर्याय उपलब्ध होतात.

सुधीर कांदळकर