कुठल्याही भाषेत तंतोतत अर्थ असणारे समानार्थी  प्रतिशब्द क्वचितच असतात.  अक्का, ताई, अनुजा, जिजी, सहोदरा, स्वसा, बहीण हे समानार्थी नाहीत हे वरच्या प्रतिसादांवरून ध्यानात आलेच असेल. सूर्य, रवी, प्रभाकर, दिनकर, दिवाकर असल्या सूर्याकरिता असलेल्या बहुतेक सर्व शब्दांच्या अर्थच्छटा भिन्‍न आहेत. कुंडलीत रवी असतो, सूर्य नाही. दिनकर म्हणजे दिवस आणि रात्र निर्माण करणारा, दिवाकर म्हणजे फक्त दिवस.  आपण दिनांक म्हणतो, दिवसांक किंवा दिवांक नाही, कारण दिन आणि दिवस यांच्या अर्थांत फरक आहे. प्रभाकर म्हणजे दिवाकर नाही हे उघडच आहे. 
एका शब्दाचे जेवढे अर्थ असतील तेवढे आणि तेवढेच जर दुसऱ्या एखाद्या शब्दाचे असून ते दोन शब्द कोणत्याही संदर्भात एकमेकांऐवजी वापरता येत असतील तरच त्यांना समानार्थी शब्द म्हणता येईल. असे शब्द भाषेत क्वचितच सापडतात. रोजेच्या(Roget's) जगप्रसिद्ध इंग्रजी पर्यायी शब्दकोशाच्या(थिसोरसच्या) प्रस्तावनेत हा खुलासा केलेला सापडेल.
मोल्सवर्थच्या इंग्रजी-मराठी शब्दकोशात एका इंग्रजी शब्दासाठी अनेक मराठी शब्द मिळतील.  बाबा पदमजींनी पुन:प्रकाशित केलेल्या या शब्दकोशातले छप्पन्नावे पान   दुवा क्र. १ येथे पाहा. मारणे या अर्थाचे शेकडो मराठी तथाकथित समानार्थी शब्द सत्तावन्‍नाव्या आणि अठ्ठावन्‍नाव्या पानावर दिसतील.