शुद्धलेखन आणि अशुद्धलेखन असे वर्गीकरण नको. फारतर प्रमाणित लिपीचा किंवा शैलीचा (भाषेचा नव्हे) आग्रह करावा पण जोरजबरदस्ती नको. प्रत्येकच बोली भाषा त्या त्या स्थळी आणि त्या त्या काळी शुद्धच असते. महाराष्ट्रातल्या फार मोठ्या भागात वरन, हरन, दळन, शरन, मरन वगैरे शब्द असेच उच्चारले जातात मग ते तसेच लिहिण्याला विरोध का? वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, मालवणी या सर्वच बोलींतील उच्चार तसेच लिहीले जावेत आणि त्याला कोणाचा विरोध असू नये असे वाटते. ही विविधता सांस्कृतिक वैभव आहे. स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या बोलीची अशुद्ध म्हणून अवहेलना करणे बरोबर नाही.
शुद्ध लिहीणे म्हणजे भेसळ नको, म्हणून आंग्ल 'टेबल' चालत नाही पण (धर्मांतरीत) 'खुर्ची' मात्र चालते, तसे पाहीले तर खुर्ची हा मराठीतील शुद्ध (?) शब्द हा त्या शब्दाच्या मूळ भाषेत तसाच उच्चारला तर अशुद्ध गणला जाईल. 'झाला' हा शब्द काही वर्षांपुर्वी असाच उच्चारला असता तर तोही अशुद्ध गणला गेला असता. स्थल-कालापरतत्वे शुद्धाशुद्धतेच्या कल्पना बदलत राहतात. त्यामूळे कुठले बंधन नको. फारतर लेखनाचा एखादा high level आराखडा/ प्रारूप ठरवून द्यावे, पण त्याला गुरूत्त्वाकर्षणाच्या नियमांच्या चालीवर शुद्धलेखनाचे नियम वगैरे नाव देऊ नये, कारण गुरुत्त्वाकर्षणाचा नियम वर्षानुवर्षे तसाच आहे आणि राहीलही, पण पंचवीस वर्षांपूर्वी असलेली प्रमाणित भाषेची शैली आताही तशीच असून पुढेही तशीच राहील असे म्हणणे मात्र धैर्याचे आहे.