जर "अनीय"-अंती शब्द मराठीमध्ये बनतात, हे माहीत आहे, "संग्रह"-आदी असलेली रूपे माहीत आहेत, तर "संग्रहणीय" शब्द शब्दकोशात शोधण्याची इच्छा का व्हावी? "शब्दयोगी अव्यय" आणि "प्रत्यय" यांच्यामध्ये काही फरक असतो की नाही याबद्दल मराठी वैयाकरणांत मतभेद आहेत. तुम्ही भेदवादी असाल तर "नावाआधी" हे उदाहरण दृष्टांतस्वरूप माना. अभेदवादी असता, तर "शब्दयोगी अव्यय" विरुद्ध "प्रत्यय" हा विचार तुमच्या मनात उद्भवला नसता. पुढे तुम्ही "अलिखित संकेतां"बद्दल बोलणार आहात. तोच खरा मुद्दा आहे. म्हणून वैयाकरणां-वैयाकरणांतल्या या लिखित वादापासून दूरच राहूया.
होय, आणि बोलण्या-लिहिण्याच्या भरात ते अलिखित संकेत कुठले, ते ठरवायला मी समर्थ आहे. कारण मी आत्मविश्वासाने मराठी बोलणारा मराठी-स्वभाषक आहे. तुम्ही येथे मुद्द्याचा आरोप केला तो असा : "मराठीतले अलिखित संकेत कुठले, ते 'संग्रहणीय' शब्द 'संग्रह करण्या योग्य' अर्थाने वापरणाऱ्याला माहीत नाहीत". असा आरोप ऐकल्यानंतर कदाचित शंका येऊ शकते - बहुतेक मराठी भाषकांना मी वापरलेला अलिखित संकेत कळतो का? बहुतेक मराठी भाषकांना वेगळाच कुठला अलिखित संकेत आणि वेगळाच अर्थ कळतो का? इतके मी लक्षात घेतलेले बरे. आरोप थेट केला त्यामुळे प्रतिवादही सोपा झाला. अनेक मराठीभाषक लोकांकडून मला कळले, की "संग्रहणीय" शब्दाचा अर्थ "संग्रह करण्यायोग्य" असा अर्थ त्यांना समजून येतो. म्हणजे अलिखित संकेत कुठला तो कळला. क्वचित कोणाला मी वापरलेला संकेत मराठीस शोभणारा वाटला नाही, तर त्याच्याकडे यथेच्छ दुर्लक्ष मी करू शकतो.
उद्धृत : उपक्रमावर संग्रहणीय या शब्दाची इतकी विविधांगी(हा शब्द कोशात मिळेल याची
खात्री देता येत नाही!)चर्चा झाली आहे, की यापुढच्या काळात कोणी मराठीत
संग्रहणीय म्हणण्यालिहिण्याची हिंमत करणार नाही; इतकेच नव्हेतर, सहवास हा
शब्द लिहायलापण मराठी माणूस कचरेल.
येथे सुद्धा तुम्ही मुद्द्याचे बोललात. उपक्रमावरील किंवा येथील चर्चेमुळे "सहवास" शब्द मराठीत वापरण्याबाबत कोणी कचरू लागेल, असे झाले तर फार वाईट होईल. पण तसे होणार नाही. तसेच "संग्रहणीय"बाबतही. काही मुले "आपुलीशी" शब्द उच्चारताना हसतात, याची आठवण मनामधून जात नाही. हा शब्द बहुतेक लोक स्वतःहून वापरतही नाहीत. पण कधी कोणी वापरलेला वाचनात आला, तर इष्ट अर्थ समजण्यात बहुतेक प्रौढांना कुठलाही विलंब लागत नाही. कदाचित "आपुलीशी" म्हणताना हसणाऱ्या मुलांची आठवण येता बालकांबद्दल जी सहानुभूती वाटते, त्या प्रकारची सहानुभूती "संग्रहणीय" शब्द ऐकून हसू फुटणाऱ्या लोकांबद्दल वाटेल.