प्रत्ययान्त शब्द वापरण्यासाठी मराठी-स्व-भाषकाला शब्दकोशाची गरज कधीच नसते.
डीजेंच्या केवळ या विधानाबद्दल माझा हा प्रतिसाद असेल. 'संग्रहणीय'वरच्या बाकी चर्चेत मी भाग घेऊ इच्छित नाही.
धातूला य, तव्य आणि अनीय प्रत्यय लावून संस्कृतमध्ये विशेषणे बनतात. त्यांतील काही विशेषणे नामासारखीही वापरता येतात हे सर्वश्रुत आहे. एका धातूपासून बनलेले असे शब्द संस्कृतमध्ये कदाचित एकाच अर्थाने वापरात असतीलही. मराठीत मात्र तसे असेलच असे नाही.
उदाo 'भू'पासून बनलेल्या भाव्य, भवनीय आणि भवितव्य या शब्दांपैकी मराठीत फक्त भवितव्य आहे, बाकीचे नाहीत. भवितव्य या अर्थाने कुणी भाव्य वापरू लागले ते अयोग्य समजले जाईल. सं+भू या धातूपासून बनलेल्या तीन कविधाविंपैकी संभाव्य आणि संभवनीय ही दोन रूपे मराठीत प्रचलित आहेत. परंतु त्यांचा वापर एकसमान नाही. संभाव्य हे बहुधा विशेषण म्हणून आणि संभवनीय हे क्रियाविशेषणासारखे. "अपघाताचे संभाव्य ठिकाण" अशी पाटी महामार्गांवर दिसते. इथे संभाव्य हे उघडउघड विशेषण आहे. आता हे वाक्य पाहा : "अपार मेहनत केल्याने त्यांना हे उज्ज्वल यश संभवनीय झाले." इथे संभवनीय हे क्रियाविशेषण आहे. संभाव्य आणि संभवनीय यांच्या वापरांची दिलेल्या वाक्यांत अदलाबदल करून पाहावी. कसेसेच वाटेल. संभाव्यपेक्षा संभवनीयमध्ये जास्त 'प्रॉबेबिलिटी" दर्शविली जाते. म्हणजे हे दोन शब्द अर्थ आणि/किंवा वापर यां बाबतीत एकसम नाहीत.
आज पावसाचा संभव आहे; आज पावसाची (किंचितशी)संभावना आहे; यजमानाने ब्राह्मणांची महावस्त्र, श्रीफळ आणि वर भरघोस दक्षिणा देऊन संभावना केली; "तुमच्या घरी आलो असताना या बसा म्हटले नाहीत, आणि साधे पाणीदेखील विचारले नाहीत; चांगली संभावना केलीत आमची!" या वाक्यांत संभव, संभावना यांची उलटापालट करता येईल?
'संभाव्य पावसाचे दिवस', किंवा, 'ढगांवर सिल्व्हर आयोडाइडचे किंवा बारीक दळलेल्या मिठाचे बीजारोपण करून कृत्रिम पाऊस पडणे संभवनीय होणार', यांसारख्या शब्दयोजना करताना संभाव्य, संभवनीय हे शब्द एकदुसऱ्यांच्या जागी वापरणे उचित वाटेल?
संस्कृतमध्य २२ उपसर्ग आहेत, अनेकानेक (तद्धित आणि कृदन्त) प्रत्यय असतील परंतु प्रत्येक धातूला सर्व उपसर्ग लागून वेगळ्या अर्थाचे धातू बनत नाहीत; तसेच सर्व शब्दांना सर्व प्रत्यय लागून नवीन शब्द होत नाहीत, हे मुद्दाम सांगायला हवे?
फारसी-अरबीतून निदान पंधरा उपसर्ग मराठीत आले आहेत. म्हणून काही गैरहजरच्या ऐवजी बेहजर म्हणता येते? एका भाषेत तंतोतंत एकाच अर्थाचे दोन शब्द क्वचितच असतात, दोन झालेच तर एकाचा वापर कमी होऊन दुसरा टिकतो.
हिंदीच्या अतिपरिचयाने संग्रहणीय हा शब्द कदाचित संग्राह्यची अवज्ञा करेलही, कुणी सांगावे?