पतंगांबाबत मुंबईतली परिभाषा एकदम वेगळी आहे. मुंबईतील पतंगोत्सव प्रामुख्याने गुजराती बंधूंकडून आलेला असल्यामुळे असेल कदाचित.
पतंगांचे प्रकार :
१) पुद्दी : वर वर्णन केलेली टुक्कल
२) ढेपः मोठ्ठा पतंग
३) दुरंगी : दोन रंगातला. दोन रंगांचे कागद दोन आयत या स्वरूपात.
४) डबल्याः पुन्हा दोन रंगी परंतु दोन रंग त्रिकोण या स्वरूपात
५) मेणबत्तीः साधारण २ इंच रुंदीची वेगळ्या रंगाची पट्टी सरळ काडी ला समांतर, काडी या पट्टीच्या मध्यभागी.
६) सूप वाला : पतंगाच्या वरच्या दोन बाजू (म्हणजे वाकड्या काडी जवळच्या) जवळ वेगळ्या रंगाचा कागद.
७) शेपटीवाला.
८) तेलकटी : महागातला.. बटर पेपर सदृश्य कागदाचा वापर.
९) डोळेवाला : डोळ्यांप्रमाणे दोन गोल असलेला.
इतर काही शब्द :
१) कणी : पतंगाला बांधलेला त्रिकोणी मांजा. यातही झिरो-जिरो, झिरो-वन असे प्रकार (तिकोणाच्या बाजूची लांबी आणि पतंगावरील भोकांमधिल अंतरे यावर अवलंबून).
२) झोल : मांज्याच्या एका टोकाला दगड बांधून तो गोफणीसारखा गोलगोल (शक्यतो उभा) फिरवून सोडायचा आणि अडकलेल्या पतंगाच्या मांज्यात अडकवून तो पतंग पकडायचा. या दगड बांधलेल्या दोराला झोल म्हणतात.
३) लग्गा : लांब काठीच्या टोकाला झुडपाची काटेरी फांदी बांधलेली असते. कापलेले पतंग पकडण्यासाठी उपयोग. ज्याचा लग्गा मोठा त्याला पतंग मिळण्याची शक्यता अधिक.
४) फिरकी / चरखी : मांजा गुंडाळायचे रीळ.
५) लपेटणे : मांजा गुंडाळणे (अंगठा व करंगळी वापरून इंग्रजी ८ प्रमाणे आकार करणे, किंवा फिरकीला गुंडाळणे.
६) कायपोचे/कायपोछे : पतंग कापल्यावर प्रतिपक्षाला चिडवणे
७) टिकली : अतिशय उंचावर उडणारा पतंग. टिकलीएवढा लहान दिसतो.
८) भरदोर कापणे : कापलेल्या पतंगाला समजा खूप मांजा असेल तर तो 'भरदोर' उदा. बहुधा 'हातापासून' कापलेला 'टिकली'.
९) लटकवणे : एखादा भरदोर कापलेला पतंग आपल्या उडणाऱ्या पतंगाला अडकवून 'पकडणे'
८) भिरभिऱ्या : गोल गोल फिरणारा पतंग. हा बहुधा एका बाजुला कलत असतो किंवा 'गोता खात' असतो. पतंग लटकवण्यासाठी भिरभिऱ्या उत्तम.
९) स्थिर पतंग : आपण टिचक्या न मारल्यास शक्यतो जागा न बदलणारा.
१०) ढिल देणे : फिरकीतून मांजा सोडत जाणे.. पतंग उंच जातो.
११) घसटणे : वर उल्लेखलेले हापसणे.
१२) थाप मोडणे : पतंगाची सरळ काडी आतल्या बाजूला वाकवणे. यामुळे जोरदार वाऱ्यात पतंगाचा टिकाव लागतो. अन्यथा पतंग फाटणे/काडी तुटणे असे होऊ शकते.