प्रिय नीलहंस,
बालकवींची कविता येथे प्रस्तुत केलीस म्हणून शतशः आभार. बालकवी शब्दप्रभू भावप्रभू होते.
पारवा या कवितेचा मला भेटलेला अर्थ लिहायचा प्रतत्न करतो आहे.
भिंत खचली,कलथून खांब गेला,
जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला;
तिच्या कौलारीं बसुनि पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो.
बालकवींचे निरिक्षण कौशल्य काय सूक्ष्म होते याचा अंदाज या कडव्यातून येतो. माझ्या मते पारवा या पक्षाचे रूपक घेऊन बालकवी एका प्रवृत्ती वर बोट ठेवतात आहेत. इथे पारव्या चे आवडते ठिकाण चितारले आहे.
सूर्य मध्यान्हीं नभीं उभा राहे,
घार मंडळ त्याभवतिं घालिताहे.
पक्षि पानांच्या शांत सावल्यांत
सुखे साखरझोपेंत पेंगतात.
एकीकडे पारवा त्याचे जग आता त्याच्या बाहेरचे जग विषद केले आहे. प्रकृती चे निराळे रंग, पक्षांचे निराळे रंग, त्यांचे आपापली आयुष्ये आहेत याचे चित्र इथे काढलेले आहे
तुला नाही परि हौस उडायाची,
गोड हिरव्या झुबक्यांत दडायाची,
उष्ण झळया बाहेर तापतात.
गीतनिद्रा तव आत अखंडीत
या कवितेत हे खूप महत्वाचे कडवे ठरते कारण यातून कारण मीमांसा सुरू होते. दोन्ही प्रकारचे स्थलकाल वर्णन झाले आता स्वभाव वैशिष्टांचे वर्णन आहे. पारव्याला आपल्या कसेका असेना घरातच बसायची हौस आहे. बाहेर उष्ण झळा आहेत, हिरवे झुबके आहेत, चांगले आहे वाईट आहे पण पारव्याला त्याचे फारसे भान नाही. पारवा आपल्यात गुंग आहे हे गीतनिद्रा अखंडित अश्या शब्दांनी येथे वर्णीत आहे.
चित्त किंवा तव कोवळ्या विखारें
दुखतखुपतें का सांग, सांग बा रे!
तुला काही जगतात नको मान?
गोड गावे मग भान हे कुठून?
आता पर्यंत काय आहे हे शब्दात लिहिले आता कवीच्या मनातली कारण मीमांसा प्रस्तुत होतेय. का रे बाबा, तुला काही भीती वगैरे आहे का रे? त्यांच्या मताप्रमाणे पारव्याला फारसा मान नको, किंवा जगात मिसळण्याची कदाचित त्याला भीती पण वाटत असेल. बालकवींनी इथे एक प्रमुख मुद्दा उपस्थित केलाय की पारवा ही वृत्ती स्वतःच्या जगात गुंग असते बाहेरच्या जगाच्या चांगल्या वाईटाची अजिबात कल्पना, पर्वा, त्याला नसते.
झोंप सौख्यानंदात मानवाची
पुरी क्षणही कोठून टिकायाची?
दुःखनिद्रें निद्रिस्त बुद्धराज
करूणगीतें घुमवीत जगीं आज.
सुखाचे क्षणभंगुर असणे आणि दुःखाचे चिरकाल असणे याचा सिद्धांत या कडव्यात मांडलाय आणि त्याचा दृष्टांत पुढच्या कडव्यात दिलाय असे वाटते.
दुःखनिद्रा ती आज तुला लागे;
तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगें.
फिरे माझ्या जगतात उष्ण वारें,
तुला त्याचे भानही नसे बा रे!
इथे पारवा ही अश्या लोकांचे वृत्ती असल्याचे भासते जे इतरांचा सुख दुःखापासून अलिप्त असतात. ज्यांचा आपले सुख आपलेच दुःख याचे गाणे गाण्यात रस असतो. जगात काय चाललेय काय नाही याचा त्यांना मागमूसही नसतो आणि या गोष्टीची खंतही नसते. अश्या अलिप्त प्रवृत्तीचे हे सूचक वाटते. कवीने अश्या प्रवृत्तीला म्हटलेय की का रे बाबा स्वतःत इतका गुंग आहेस की माझ्या सुख, दुःखाची, उन्हाची झळांची पण तुला काही तमा नाही.
ही कविता वाचून मला जो काही बोध झाला तो असा होता. अधिक सूक्ष्म अर्थ असेलही या कवितेत अधिक जाणकार मनोगतींनी यावर लिखाण केले तर माझ्याही विचारात भर पडेल.
सौमित्र